Wednesday, July 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यनिवडणुकीतील बजेट

निवडणुकीतील बजेट

सीमा दाते

मुंबई महानगरपालिका, सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून प्रसिद्ध आहे. देशातील सगळ्या महापालिकांपैकी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सगळ्यात जास्त असतो. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३९ हजार ८३ कोटी रुपयांचा होता. विकासकामांसाठी भरीव तरतूद, आरोग्यासाठी तरतूद अशा सगळ्यांनी हा अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प सगळ्यात मोठा अर्थसंकल्प होता, २०१९-२०२०च्या अर्थसंकल्पापेक्षा यात १६.७४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. संपूर्ण अर्थसंकल्पांवर विकासकामांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता येणारा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी काय घेऊन येणात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकांना समोर ठेवून या अर्थसंकल्पाची घोषणा करणार आहेत हे नक्की. मुंबईकरांसाठी काही खास योजना, सवलती या सगळ्या यावेळी महापालिकेच्या पेटाऱ्यात असणार आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात साधारण ८ टक्के वाढ असणार आहे. मुंबईतील विकासकामांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरणार आहे. आधीच राज्य सरकारने मालमत्ता कर माफ केल्याने मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना तो एक फायदा होण्याची शक्यता आहे, तर कोस्टल रोड म्हणजेच सत्ताधाऱ्यांचा महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प त्यामुळे या अर्थसंकल्पात देखील कोस्टल रोडसाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. त्यानंतर मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करणे अशा प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद असणार आहे. मुलुंड-गोरेगाव जोड रस्त्यातील भुयारी मार्गाचे काम पुढच्या आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पात असणार आहे. त्याचबरोबर रस्त्यांसाठी देखील मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागत होते, मात्र काही दिवसांपूर्वीच निवडणुका समोर ठेवून दोन हजार कोटींहून अधिक रस्ते कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्ते कामांसाठी देखील मोठी तरतूद असणार आहे. मुंबईतील पुलांच्या दुरुस्तीची कामे ही महापालिकेने हाती घेतली आहेत, त्यामुळे या पुलांच्या कामांसाठी देखील मोठी तरतूद केली आहे. याच विकासकामांमध्ये नद्यांचे सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग तसेच कचऱ्याचा विल्हेवाट प्रकल्प, कचऱ्यापासून वीज प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे या सगळ्यांसाठी तरतूद असणार आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देणे, पर्यावरणाचे संवर्धन होणे यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जाणार आहेत.

तर शिक्षण विभागासाठी देखील अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद असणार आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा यासाठी निधी असणार आहे.

विशेष म्हणजे यावेळच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेला अतिरिक्त खर्चाचा बोजा पडला होता. मात्र आता आरोग्यासाठी मोठी तरतूद केली जाणार आहे. मुंबईतील काही दवाखान्यांचे विस्तार, रुग्णालयांचा विस्तार केला जाणार आहे. मुंबईतील प्रसूतिगृहाचे आधुनिकीकरण. मुलुंड-अग्रवाल, कांदिवली-शताब्दी या रुग्णालयांचे विस्तारीकरण, या सगळ्यांसाठी भरघोस निधीची तरतूद असणार आहे. विशेष म्हणजे कोविडसाठी देखील निधी असणार आहे.

आगामी निवडणुकीत महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत, मात्र सत्ताधारी शिवसेनेला आगामी निवडणुकीसाठी अर्थसंकल्पातून फायदा होण्याची शक्यता आहे, हाच विचार करून अर्थसंकल्पात अनेक मोठ्या तरतुदी केलेल्या आहेत. मतदारांना खूश करण्यासाठीचा हा अर्थसंकल्प असल्याने यात आणखी कोणत्या गोष्टी महापालिकेच्या अर्थसंकल्प पेटाऱ्यातून समोर येणार आहेत. यंदाची निवडणूक ही महाविकास आघाडी वेगवेगळी लढणार असली तरी त्यांना आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे अनेक सवलती मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात असणार आहेत. आधीच ५०० चौ. फुटांच्या घराचा मालमत्त कर माफ केलेला आहे, तर त्यातच मुंबईकरांना खूश करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ देखील नसण्याची शक्यता आहे.

हा अर्थसंकल्प एकप्रकारे सत्ताधाऱ्यांचा वचननामा असल्याचे म्हणता येईल, त्यामुळे या निवडणुकीतील अर्थसंकल्पात सगळ्याच मुंबईकरांचे लक्ष असणार आहे.

गुरुवारी ३ फेब्रुवारीला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह स्थायी समितीत अर्थसंकल्प सादर करतील, मात्र त्यानंतर महासभेत चर्चा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -