स्टेटलाइन : सुकृत खांडेकर
सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनतेने सरकार स्थापन करण्यासाठी भाजप- शिवसेना युतीला कौल दिला होता. पण भाजपने सत्तावाटपाचा दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेनेने भाजपशी संबंध तोडले आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. युती तोडण्याची किंमत म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आणि तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आमदारांची संख्या असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्ता मिळाली. सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला मंत्रालयापासून दूर ठेवण्याचा लाभ महाआघाडीतील तीनही पक्षांना झाला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सर्वात महत्त्वाचे होते. काँग्रेस, राष्ट्रवादीने ते खुशीने दिले.
सव्वादोन वर्षांनंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाआघाडीच्या समिकरणावर खूश आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत सर्वात जास्त प्रखर हल्ले काँग्रेसवर चढवले. ठाकरी भाषेतील असंख्य वार शरद पवारांवर केले. पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणांतून सर्वात जास्त टीका भाजपवर केली जात आहे. उद्धव यांच्या मनात असलेला भाजपविषयीचा संताप आणि तिरस्कार कमी झालेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली जवळीक हीच त्यांना आता सुखाची व सोयीची वाटत आहे.
शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे दोन अडीच महिन्यानंतर जनतेला टीव्हीच्या पडद्यावरून दर्शन घडले. गेले दोन महिने मुख्यमंत्री कसे आहेत, त्यांना नेमके काय झाले आहे, ते कधी बरे होणार, ते पूर्ववत काम कधी सुरू करणार? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात होते. पण त्याचे कोणी उत्तर देणारे नव्हते. खरं तर व्हीव्हीआयपींवर वैद्यकीय उपचार चालू असले की, दैनंदिन मेडिकल बुलेटिन निघते, उपचार करणारे डाॅक्टर माहिती देतात. पण मुख्यमंत्र्यांवर मेजर शस्त्रक्रिया होऊनही त्याची माहिती कोणी दिली नाही. उद्धव हे मुख्यमंत्री आहेत म्हणूनच त्यांच्याविषयीची माहिती जनतेला समजणे जरूरीचे आहे.
शिवसेनेने यापुर्वी मनोहर जोशी व नारायण राणे हे दोन मुख्यमंत्री दिले. मनोहर जोशी हे वयपरत्वे घरीच असतात क्वचितच सेनेच्या कार्यक्रमात दिसतात, तर राणे हे भाजपमध्ये केंद्रात मंत्री आहेत व राजकारणात सतत आक्रमक आहेत. उद्धव हे मुख्यमंत्री झाल्यापासून सुरूवातीला मातोश्री व नंतर वर्षा या शासकीय निवासस्थानी मुक्कामाला आहेत. मग शिवसेनेच्या वतीने राज्यात कोण फिरते आहे, जनतेला मंत्रालयात किंवा शिवसेना भवनमध्ये कोण भेटते आहे, पक्षप्रमुखांनी ही जबाबदारी कोणावर सोपवली आहे? मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत म्हणून अन्य नेते व पदाधिकारीही बाहेर फिरताना, दौरे करताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते राज्यभर फिरत असतात. लोकांशी संवाद साधत असतात. भाजप हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असल्याने सतत प्रकाशझोतात असतो. मग राज्यात शिवसेना कुठे आहे? शिवसेनेच्या एका मित्राने विचारले की, मोदी तरी लोकांना भेटतात का? पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची तुलना योग्य नाही हे त्याला कोण सांगणार? मोदी देश-विदेशात जेवढे फिरतात व आपल्या सहकारी मंत्र्यांना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जेवढे काम देऊन बिझी ठेवतात, त्याला तोड नाही. संघटन आणि प्रशासन यांना सतत कार्यान्वित ठेवतात. मोदी घरात बसून आहेत, असे कधी होत नाही. त्यांच्याएवढी काम करण्याची क्षमता आजवर कोणत्याही पंतप्रधानांकडे वा मुख्यमंत्र्यांकडे नसावी.
दिवाळीच्या आधीपासून महाराष्ट्रात एक लाख एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी संपावर तोडगा काढणे, ठाकरे सरकारला जमले नाही. २५-३० हजार कर्मचारी म्हणे कामावर परतले आहेत. पण लाल परी गावागावांतून धावू लागलेली नाही. एसटी कामगार संपापुढे ठाकरे सरकार हतबल झाले आहे का? ७० हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत आणि ६५ लाख प्रवाशांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. शिवसेनेचे परिवहनमंत्री असताना त्यांच्या सरकारवर ही वेळ का यावी?
शिवसेनेच्या स्थापनेला ५६ वर्षे झाली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २३ वर्षे झाली. पण या दोन्ही पक्षांनी राज्यात स्वबळावर सत्ता मिळवली नाही किंवा या दोन्ही पक्षांना कधी शंभर आमदार निवडून आणता आले नाहीत. दोन्ही पक्षांचे नेते लंबे-लंबे गप्पा मारतात. मग त्यांचे पाऊणशे आमदार तरी का निवडून येत नाहीत? शिवसेनेचे सर्वाधिक ७३ आमदार निवडून आले होते. या विधानसभेत ५६ आमदार आहेत.
तामिळनाडूत जयललिता, करूणानिधी, एम. के. स्टॅलिन, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू, तेलंगणात चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ओरिसामध्ये नवीन पटनाईक, स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकले, मग ते भाग्य महाराष्ट्रात शिवसेनेला का लाभले नाही? चाळीस हजार कोटींचे बजेट असलेली मुंबई महापालिका हा त्यांचा प्राणवायू आहे, गेली तीस वर्षे सेनेची मुंबईवर सत्ता आहे. मग एकदाही शिवसेनेला स्वबळावर स्पष्ट बहुमत का मिळाले नाही?
भाजप-शिवसेना युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हे तिघेही हयात नाहीत. युतीला आशीर्वाद देणारे अटलबिहारी वाजपेयीही हयात नाहीत. लालकृष्ण अडवाणी हे वयोमानाप्रमाणे घरीच आहेत. सेना-भाजप दुवा जोडणारा पूलच अस्तित्वात नाही. शिवसेना आणि भाजप यांच्या सत्तास्पर्धेत युतीला पूर्णविराम मिळाला आणि उद्धव यांनीही भाजपशी आता कायमचा काडीमोड घेतल्याचे जाहीर केले. युतीत आम्ही पंचवीस वर्षे सडलो, याचा दुसरा अर्थ काय असू शकतो?
शिवसेना ही फॅसिस्ट संघटना आहे, शिवसेना ही मुंबईच्या जीवनाला लांच्छनास्पद आहे, असे यशवंतराव चव्हाण हे केंद्रात गृहमंत्री असताना म्हणाले होते. देशाच्या अखंडता, एकता व प्रगतीला शिवसेनेचा धोका आहे, असे उद्गार इंदिरा गांधींनी काढले होते. शिवसेना ही विषवल्ली असून तिचा समूळ नायनाट करायला हवा, असे यशवंतरावांनीच म्हटले होते. मतांसाठी व सत्तेसाठी पदोपदी काहीही सांगणाऱ्या शरद पवारांना त्यांच्या खुर्चीसकट हटवले पाहिजे, असे स्वत: बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पवारांनी शिवसेनाप्रमुखांच्या किरकोळ यष्टीच्या छातीचा उल्लेख करताच ठाकरे म्हणाले, “माझ्या छातीत लोकांसाठी प्रेम आहे, तुमच्या छातीत बिल्डरांचा एफएसआय आहे.” १९९९मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधींना पंतप्रधान होऊ देणार नाही, असा शिवसेनाप्रमुखांनी प्रचार केला होता. छगन भुजबळांनी आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना सामनातील अग्रलेखावरून शिवसेनाप्रमुखांना अटक केली होती. शिवसेनेवर बंदी येईल त्याक्षणी काँग्रेसची तिरडी बांधली जाईल, असा सज्जड दम शिवसेनाप्रमुखांनी मुंबई काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा रजनी पटेल यांना दिला होता…. मग हेच पक्ष ठाकरे सरकारमध्ये एकत्र कसे नांदत असतील?
पंचवीस वर्षे असलेले घट्ट असलेले मित्र महाराष्ट्रात एकमेकांचे कट्टर वैरी बनले आहेत. थेट शत्रूला कोणीही अंगावर घेऊ शकतो, इथे मित्रावरच शत्रू म्हणून तोफा डागणे चालू आहे. मुख्यमंत्रीपद असलेला पक्ष नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर जातो. म्हणूनच ‘चलो दिल्ली’ या घोषणेचे आश्चर्य वाटते?