मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’समोर महत्त्वपूर्ण खुलासा केल्याने १०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
‘ईडी’कडून १०० कोटींच्या वसूली प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. ७ डिसेंबर २०२१ रोजी ‘ईडी’कडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली ‘ईडी’समोर दिली आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाच्या चौकशीदरम्यान वसूली प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असणारा पोलीस अधिकारी सचिन वाझे याला ओळखत नसल्याचा दावा केला होता. मी सचिन वाझेला चेहऱ्याने आणि नावानेही ओळखत नव्हतो, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. तर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले होते. आपली अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले होते. त्यानंतर अनिल देशमुख हे सातत्याने जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, आता सीताराम कुंटे यांच्या जबानीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. आता ‘ईडी’कडून अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोणते नवे पाऊल उचलले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सीताराम कुंटे हे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या मुख्य सचिव पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सल्लागारपदी वर्णी लागली होती. सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अधिकारी असल्याचे मानले जाते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही पोलीसांच्या बदल्यांतील अनिल देशमुख यांच्या हस्तक्षेपाविषयी ईडीला माहिती दिली होती. ईडीला दिलेल्या जबानीत परमबीर सिंह यांनी म्हटले होते की, त्यांनी जुलै २०२० मध्ये मुंबईतील १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. त्यावेळी परमबीर सिंह यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी सल्लामसलत केली नव्हती. मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी मला सीताराम कुंटे यांचा व्हॉटसअॅप मेसेज आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले होते.
कोट्यवधी रुपयांची माया अवैधरीत्या जमवून नावापुरत्या असलेल्या अनेक कंपन्यांमार्फत देणग्यांच्या माध्यमातून नागपूरस्थित आपल्या शिक्षणसंस्थेत चार कोटी ७० लाख रुपये वळवले, अशा आरोपांखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली.
‘ईडी’ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देशमुख व त्यांच्या दोन मुलांविरोधात सात हजार पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. न्या. राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची शुक्रवारी दखल घेऊन आरोपींविरोधात कायदेशीर कार्यवाही (प्रोसेस) सुरू केली. यापूर्वी या प्रकरणात ईडीने देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्यासह १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.