Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यनिरलस व्यक्तिमत्त्व हरपलं!

निरलस व्यक्तिमत्त्व हरपलं!

स्वाती पेशवे

अनिल अवचट हे नाव अनेक क्षेत्रांशी संबंधित होतं. साहित्य, कला, सामाजिक कार्य आदी महत्त्वपूर्ण प्रांगणांमध्ये मुक्त संचार करणारं आणि आपल्या संपर्कात येणाऱ्यांमध्ये विवेकी विचारांची पेरणी करणारं हे नाव आता काळाच्या पडद्याआड गेलं आहे. पण व्यक्ती गेली तरी विचार जिवंत असतात. याच न्यायानं त्यांची व्यसनमुक्तीची चळवळ, उच्च अभिरूची आणि संवेदनशीलता अनेकांच्या आयुष्याला आकार देईल हे नक्की.

साहित्य, लेखन, सामाजिक काम, हस्तकला, चित्ररेखाटन, व्यसनगस्तांसाठी दिशादर्शनाचं काम अशा एक ना अनेक माध्यमांतून आपल्याला ज्ञात असणारे डॉ. अनिल अवचट नावाचं एक गारुड आता शांत झालं आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे संस्थापक या ओळखीबरोबरच त्यांनी विविध कामांद्वारे निर्माण केलेली ओळख पुढील अनेक वर्षे कायम राहणार असली तरी त्यांच्या रूपानं समाजातलं एक जाणतं आणि तळमळ असणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड केलं आहे. त्यांनी कळत-नकळत अनेक कार्यकर्ते घडवले जे आज त्यांचाच वसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या कामाची धुरा खंबीरपणे सांभाळत आहेत. अर्थात असं असलं तरी यापुढे त्यांची जागा रिकामी बघावी लागणं ही अत्यंत दु:खद बाब आहे.

डॉ. अवचट हे गावाकडच्या गप्पांमध्ये रमणारं व्यक्तिमत्त्व होतं. मनमोकळ्या गप्पांदरम्यान एकदा ते म्हणाले होते, ‘आमच्याकडे शेतात एक गडी होता. कणसात दाणे भरले आणि ती टिपायला पाखरं आली की, तो गोफणीतून दगड उडवून त्यांना हाकलून लावायचा. एकदा मीही गोफण घेतली आणि पाखरं उडवायला लागलो. तेव्हा तो म्हणाला, ‘फार जोर करू नको, काही वाटा पाखराचा बी असतो…’ याला म्हणतात संवेदना! आमच्या गोठ्यात बरीच जनावरं होती. त्यातील कल्याणी नावाची म्हैस गेली. आईनं ही बातमी सांगितली आणि तिला शेतातच पुरल्याचंही सांगितलं. त्यावर मी विचारलं, ढोराकडून तिचं कातडं काढून घेतलं नाही का? ती उत्तरली, ‘माझी मुलं कल्याणीच्या दुधावरच वाढली आहेत. एका अर्थी ती त्यांची आईच होती. मग आईशी कोणी असं वागतं का?’ तिच्या उत्तराने मला चूक उमगली होती. बदलत्या काळात ही संवेदनशीलता हरवताना दिसत आहे. ऋणानुबंध सैल होताहेत, नाती शुष्क होत आहेत. आता शेती ही फॅक्टरी आणि जनावरं ही मशीन आहेत. ‘यूज अँड थ्रो’च्या या जमान्यात गरज संपली की फेकून देणं हा नियम बनतो आहे. ही परिस्थिती बदलायला हवी.’ अवचट सरांचे हे विचार त्यांची संवेदनशीलता दाखवून देण्यास पुरेसे ठरावेत.

आधुनिकता आणि चुकीच्या दिशेनं वाहणारं बदलाचं वार याबाबत कायमचे ते पोटतििडकीनं बोलायचे. त्यावर अभ्यासपूर्ण भाष्य करायचे. त्यांना अपेक्षित असलेली विकासाची व्याख्या अत्यंत समतोल आणि निसर्गाचा तोल सांभाळणारी होती. या विषयावरील त्यांचे विचारही स्पष्ट होते.

वाढती व्यसनाधीनता हा तर त्यांच्या बोलण्यात वारंवार डोकावणारा विषय असे. कित्येक वर्षे व्यसनमुक्तीच्या कामात झोकून दिल्यामुळे ते यावर अत्यंत कळकळीने म्हणायचे, ‘पूर्वी गावात दोन-चार माणसं दारू प्यायची. आता पित नाहीत, अशी दोन-चार माणसं उरली असतील! दारूच्या नशेत चालणाऱ्या माणसाला वाटेत एखादा सज्जन माणूस दिसला की, तो रस्ता बदलायचा. आता सज्जन माणसांना रस्ता बदलावा लागतो. समोर ज्येष्ठ व्यक्ती दिसताच हातातील विड्या विझविल्या अथवा दडवल्या जायच्या. पण आता हा धाक आणि दरारा कुठेच राहिलेला नाही. स्पष्टपणे जाणवणारे हे बदल विषण्ण करणारे आहेत.’

गॅझेट्च्या आहारी जाऊन हे व्यसन जडलेले तरुण पाहून त्यांचं मन कातर होत असे. आमच्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रात आता सायबर अॅडिक्टही उपचार घेत आहेत. या व्यसनींना आपण व्यसनाच्या आहारी जात आहोत आणि ही बाब चुकीची आहे हे समजतंय. पण यापासून दूर जाण्याचे मार्ग त्यांच्याकडे नाहीत, असं ते सांगत असतं. यंत्रांनी माणसांवर कब्जा करावा यासारखे दुर्दैव ते कोणते? हा त्यांचा हृदयाला हात घालणारा प्रश्न असायचा. निसर्ग माणसाच्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे, स्वार्थ भागवण्यासाठी नाही… हे त्यांचं म्हणणं होतं. असे परखड आणि स्पष्ट, भरकटलेल्यांना योग्य पथावर आणणारे त्यांचे विचार हीच त्यांनी मागे ठेवलेली मोठी संपत्ती आहे. या विचारांचा पाठपुरावा करणं आणि त्यांच्या कार्याच्या पखाली वाहणारे खांदे सशक्त करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -