मुंबई : दहिसर चेकनाक्यावर दोन हजार रुपयांच्या तब्बल सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ च्या पथकाने केली. यात सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपासात या नोटा दिल्लीहून मुंबईत आणल्याचे आरोपींनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीहून दहिसरला एक आंतरराष्ट्रीय टोळी बनावट नोटांचा व्यापार करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने एक पथक नॅशनल पार्क, तर दुसरे पथक दहिसर टोलनाक्याजवळ तैनात केले. ही टोळी ओला गाडीतून नोटा घेऊन जात होती. दरम्यान पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून आरोपींसह बनावट नोटा ताब्यात घेतल्या.
या प्रकरणी चार आरोपींना दहिसर चेकनाक्यावरून, तर तिघांना अंधेरीतून अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखा युनिट ११ चे पोलीस अधिकारी विनायक चव्हाण यांनी दिली. यावेळी दोन हजार रुपयांच्या ३५ हजार बनावट नोटा जप्त केल्या. तसेच अधिक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ७ मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, २८,१७० रुपये रोख आणि एक लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संग्राम निशानदार यांनी दिली.