Sunday, January 19, 2025
Homeमहत्वाची बातमीमहाराष्ट्र मास्कमुक्त करण्याच्या हालचाली

महाराष्ट्र मास्कमुक्त करण्याच्या हालचाली

मुंबई : गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीचं संकट सर्व देशांवर आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्क घालणं बंधनकारक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्र मास्कमुक्त होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या महामारीचं संकट आहे. कोट्यवधी लोकं कोरोनाच्या विळख्यात अडकली तर लाखो लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी त्रिसुत्रीचा वापर करावा असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. या त्रिसुत्रांमध्ये मास्क परिधान करणे, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे आणि वारंवार हात धुणे या गोष्टी काळजीपूर्वक केल्यास कोरोना होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे जगभरात तसेच भारतातही लोकं मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करत असल्याचं दिसून येते.

मास्कचा वापर बंधनकारक असल्याने कुणीही मास्क परिधान न केल्यास त्याच्यावर दंडाची कारवाई करण्यात येते. परंतु महाराष्ट्र आता मास्कमुक्त होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत मास्कबाबत चर्चा झाली. जगातील काही देशांनी मास्कवरील बंधनं हटवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारतातही कोट्यवधी लोकांचे लसीकरण पूर्ण झालंय. अशावेळी कठोर निर्बंध आणि मास्कच्या बंधनातून काही देशांनी मुक्तता केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे.

राज्यात आतापर्यंत १४ कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. यात ६ कोटींहन अधिक लोकांना दुसरा तर ८ कोटी ५९ लाख १७ हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. त्यामुळे मास्कबाबत लवकरच टास्कशी फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

इस्त्राइल हा जगातील पहिला देश आहे ज्याठिकाणी मास्क घालण्याचं बंधन हटवण्यात आले. कोरोना महामारीनंतर सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत जवळपास लोकसंख्येच्या ७० टक्के जनतेचं लसीकरण करण्यात आले. त्यामुळे या देशात मास्क घालण्याचं बंधन हटवण्यात आले आहे.

भूटानमध्ये अवघ्या २ आठवड्यात ९० टक्केहून अधिक लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून या देशात केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला. भूटान हा भारत, चीन यांच्या सीमेलगतचा देश आहे. मात्र या देशातही मास्क घालण्याची सक्ती नाही.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे इंग्लंडमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. मात्र त्यानंतर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्याठिकाणी सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क लावण्याची गरज नाही असं पंतप्रधानांनी जाहीर केले आहे.

भारतात ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची शिफारस करण्यात येत नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय. याशिवाय ६-११ वयोगटातील मुलं पालकांच्या थेट देखरेखीखाली सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं मास्क वापरू शकतात असं केंद्रानं गाइडलाईनमध्ये सांगितले आहे.

१२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना प्रौढांप्रमाणेच मास्क घालावं, असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडे, विशेषत: ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तज्ञांच्या गटाद्वारे या मार्गदर्शक सूचनेत बदल केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -