नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील मनमानी कारभार करणाऱ्या १० शाळांची चौकशी गुलदस्त्यात असून, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ही चौकशी पूर्ण करून संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता ‘नाशिक पॅरेंट्स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीचा आणि त्याकडे डोळेझाक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इगतपुरी दौऱ्यावर असलेल्या शिक्षणमंत्री गायकवाड यांची भेट घेत शिष्टमंडळाने विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यासंदर्भात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही पालक संघटनेने २०२०मध्ये निवेदन दिले होते. त्यावर राज्यमंत्री कडू यांनी शाळांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. मात्र अनेक शाळांच्या बाबतीत गंभीर तक्रारी असतानाही स्थानिक शिक्षणाधिकारी कायदेशीर कारवाई करत नसल्याने आजही प्रकरण प्रलंबित आहे.आतापर्यंत अनेक शाळांची चौकशी झाली; मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.
तक्रारी असलेल्या शाळा…
नाशिक केंब्रिज स्कूल (इंदिरानगर), सेंट लॉरेन्स स्कूल (सिडको), सेंट फ्रान्सिस (राणेनगर), होली फ्लॉवर (नाशिक रोड), सिल्वर ओक स्कूल (शरणपूर रोड), विज्डम हाय इंटरनॅशनल (दोन्ही बोर्ड, गंगापूर रोड), गुरुगोविंद पब्लिक स्कूल (इंदिरानगर), सेंट फ्रान्सिस स्कूल (तिडके कॉलनी), अशोका युनिव्हर्सल स्कूल (वडाळा परिसर).