Friday, May 9, 2025

अग्रलेखसंपादकीयताज्या घडामोडी

प्रजासत्ताक भारत बलशाली होवो

प्रजासत्ताक भारत बलशाली होवो






प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय उत्सव असतो. देशभक्ती आणि देशप्रेम प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनातून आणि भावनेतून प्रकट होत असते. आपला देश सर्व जगात प्रगत आणि शक्तिशाली व्हावा, हीच प्रत्येक भारतीय नागरिकाची प्रबळ इच्छा असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कारकिर्दीतील यंदा प्रजासत्ताक दिन वेगळा आहे. या दिनाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते आणि प्रजासत्ताकाचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून संकल्पही सोडला जातो.



यंदा २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जंयती देशभर साजरी केली गेली. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यापुढे २३ जानेवारीपासून सुरू करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी जाहीर करून नेताजींविषयी आदर प्रकट केला. राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर यंदा काहीसे निर्बंधांचे सावट आहे. एकीकडे ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने घातलेले थैमान व दुसरीकडे सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेला दहशतवाद्यांनी दिलेले आव्हान, अशा दोन्ही आघाड्यांवर प्रशासन व सुरक्षा दलाला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा शांततेने व सुरळीतपणे पार पडावा, हे मोठे आव्हान आहे. यंदाच्या सोहळ्यात महाराष्ट्रासह एकवीस राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. संचलनासह सर्व सोहळा नव्वद मिनिटांत पूर्ण होणार आहे. या वर्षी कोरोना व ओमायक्रॉनचे देशावर आलेले संकट बघून विदेशी पाहुण्यांना आमंत्रित केलेले नाही, असे प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रथमच घडले.



राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेटसमोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्रामचा पुतळा उभारून पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून व मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार देशभर पोहोचविण्याची मोहीम सुरू झाली. काँग्रेसच्या साठ-सत्तर वर्षांच्या केंद्रातील कारकिर्दीत ठरावीक दोन-चार महापुरुषांच्या पलीकडे कोणाची फारशी दखल घेतली गेली नव्हती. त्यातही गांधी-नेहरू परिवाराचा सतत उदो-उदो चाललेला दिसायचा. मोदी-शहा किंवा नड्डा यांनी केंद्रात आपला पक्ष सत्तेवर असूनही आपल्या परिवाराविषयी कधी ब्र सुद्धा काढला नाही. भाजपने परिवारवादाला नेहमीच विरोध दर्शवला आहे.



इंडिया गेटसमोर नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे पंतप्रधानांनी अनावरण केले. पण त्याचबरोबर नंतर नेताजींचा ग्रेनाइटचा भव्य पुतळा उभारला जाणार असल्याचेही जाहीर केले. सरकारने नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करणार असल्याचे जाहीर केले व त्यानिमित्ताने आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल पुरस्काराचे त्यांनी वितरणही केले. नेताजींचा ग्रेनाइटचा पुतळा २८ फूट उंचीचा असणार आहे. इंडिया गेटसमोर पूर्वी जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. तो १९६८मध्ये हटविण्यात आला, त्या जागेवर आता नेताजींचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे.
इंडिया गेटसमोरून दिवस-रात्र चोवीस तास तेवत असलेली अमर जवान ज्योत ही राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला. बांगलादेश युद्धातील विजयानंतर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी अमर जवान ज्योत तेवत ठेवण्यात आली. ती काही मोदी सरकारने काढून टाकलेली नाही, तर त्याला योग्य जागा राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे, म्हणून तेथे हलविण्यात आली. मोदी सरकारने अमर जवान ज्योत हटवली म्हणून विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसने देशभर टाहो फोडला. पण ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकात स्थलांतर झाले, त्यामागचा हेतू समजावून घेतला नाही. मोदींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध एवढीच काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष भूमिका बजावत आहे. प्रत्येक निर्णयाला व प्रत्येक वेळी विरोध हे जनतेला आवडत नाही, याची जाणीव विरोधी पक्षांनी ठेवली पाहिजे. विशेष म्हणजे, मोदी विरोधकांच्या कोणत्याही विरोधी टीकाटिप्पणीला उत्तर देत नाहीत आणि देशहित डोळ्यांपुढे ठेऊन आपले काम चालू ठेवतात.



गेल्या वर्षभरात संपूर्ण देशाला कोविड-१९ या विषाणूच्या संकटाच्या आव्हानाला तोंड द्यावे लागले. यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवला. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना आणि ओमायक्रॉनने हाहाहार निर्माण केला. देशभरात सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र व अन्य काही मोजक्या राज्यांत परिस्थिती सुधारत आहे. पुन्हा नव्या उत्साहाने व उमेदीने दैनंदिन जीवनाला सुरुवात करणे, यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. अशा संकटाच्या वेळी पंतप्रधानांनी वेळोवेळी राज्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या बैठका घेऊन उपचार व्यवस्थेला गती दिली व जनतेलाही दिलासा दिला.



पंतप्रधानांच्या पुढाकाराने आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. अशा वातावरणात यंदाचा प्रजासत्ताक दिन आहे. ब्रह्मकुमारी संस्थानच्या जागतिक परिषदेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देशात ताणतणाव व भयाचे वातावरण असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परस्परांशी विरोध असेल, तर देशांत मतभेद व्यक्त करू, पण जागतिक परिषदेत देशाची प्रतिमा उंच ठेवण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, याचा विसर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पडला असावा. देशातील एका ख्यातनाम कायदे पंडितानेही आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत भारताची अर्थव्यवस्था कशी घसरली आहे व देशात लोकशाही संस्थांची कशी गळचेपी चालू आहे, हे खुलवून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रजासत्ताक दिनाला सारा देश भारताला महासत्ता बनविण्याचा विचार करतो. पण काही मोदीविरोधक देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर खराब करण्याचा प्रयत्न करतात, हे कुठे तरी थांबले पाहिजे.

Comments
Add Comment