औरंगाबाद (हिं. स.) : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्याय मिळत नसल्याचा आरोप अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र काँग्रेसमधील ही खदखद आता पुन्हा एकदा पुढे आली आहे. राज्यातील ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या दोन प्रमुख मंत्र्यांनी या अन्यायाबाबत जाहीर मतप्रदर्शन केले आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी स्वतः यावर मत व्यक्त करत, ‘महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसून, यापुढे आक्रमक होणार आहेत’, असा इशारा दिला आहे.
औरंगाबाद शासकीय रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, सरकारमध्ये असूनसुद्धा न्याय मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही हे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवले. या सर्व कार्यकर्त्यांची भावना असून, ती नाराजी दूर करायची असेल, तर काँग्रेसचा मंत्री म्हणून आम्हाला अधिक आक्रमकपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका मांडावी लागेल, असे देशमुख म्हणाले.
यापूर्वीसुद्धा राज्यातील काँग्रेस मंत्र्यांनी विकासकामांसाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती.
यशोमती ठाकूर यांनीही सुनावले
महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही मंगळवारी महिला आयोगाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीला सुनावले आहे. ‘‘एकवेळ कोस्टल रोडसाठी पैसे दिले नाहीत तरी चालेल पण मुले आणि महिलांसाठी पैसे द्यावेत यासाठी मी भांडते’’, अशा शब्दात मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या खात्याला निधी मिळण्यासाठीच्या संघर्षावर भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये २५ किलोमीटरवर शौचालये असतील, तर आपल्याकडे का नाहीत? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.