Saturday, July 13, 2024
Homeमहत्वाची बातमीछोटी बहू भाजपमध्ये

छोटी बहू भाजपमध्ये

सुकृत खांडेकर


माजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या धाकट्या सुनबाई अपर्णा यादव यांनी सपाचा त्याग करून थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने यादव घराण्यात चलबिचल झाली आहे. अपर्णा यादव या भाजपला किती फायदेशीर ठरतील आणि सपाला किती त्रासदायक ठरतील, हे काळच ठरवेल; पण यादवांच्या घराण्यात सर्व काही आलबेल नाही, हेच त्यांनी देशाला दाखवून दिले.


उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजपच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दिल्लीतील केंद्र सरकारच्या स्थापनेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे यादवांची छोटी बहू भाजपमध्ये आली या घटनेला देशभर ठळक प्रसिद्धी मिळाली. आज मुलायमसिंह स्वत: वार्धक्यामुळे सक्रिय नाहीत. पण त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव हे भाजपच्या विरोधात सर्वस्व पणाला लावून लढत असताना त्यांच्या मार्गात अपर्णा यादव या किती अडसर निर्माण करू शकतात, हे १० मार्चला निकालानंतर स्पष्ट होईल. अपर्णा सपा सोडून भाजपमध्ये गेल्या त्याचा सपावर काहीही परिणाम होणार नाही, कारण अपर्णा यांना स्वत:चे काही वलय नाही, ती कोणी मोठा नेता नाही, मुलायमसिंह यांची छोटी बहू हीच त्यांची ओळख आहे, मग त्यांच्या जाण्याने सपाचे काय नुकसान होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.


अपर्णा यादव यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आणि नंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राजधानी दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. अपर्णा या मुलायमसिंह यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीकची पत्नी आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पक्षाचे आभार मानताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली. सन २०१७मध्ये उत्तर प्रदेशमधील जनतेने भाजपला ३१२ आमदार निवडून दिले. भाजपच्या विक्रमी विजयानंतर अपर्णा यांचा भाजपकडे ओढा वाढला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांनी दोन वेळा भेटही घेतली. नंतर त्या भाजप प्रवेशासाठी योग्य मुहूर्ताची वाट पाहत होत्या.


सन २०१७मध्ये मुलायमसिंह यांच्या या छोट्या बहूने समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून लखनऊ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या रिता बहुगुणा जोशीसारख्या तगड्या उमेदवारापुढे अपर्णा यांची डाळ शिजली नाही. अपर्णा यांचा पराभव झाला. रिता बहुगुणा जोशी या आता अलाहाबादमधील भाजपच्या खासदार आहेत. अपर्णांचा पराभव केलेल्या काँग्रेसच्या रिता बहुगुणा भाजपमध्ये गेल्या आणि त्यांच्याकडून पराभव झालेल्या सपाच्या अपर्णा यादव याही आता भाजपमध्ये सामील झाल्या. हिंदी मीडियामध्ये अपर्णा यादव यांचा उल्लेख नेहमी मुलायम यांची ‘छोटी बहू’ असा केला जातो. बत्तीस वर्षांच्या अपर्णा आणि त्यांचे पती प्रतीक यादव हे त्यांच्या लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. अपर्णा यांचे शिक्षण लखनऊच्या लोरेंटो कॉन्व्हेंट इंटरमिडिएट कॉलेजमधून झाले. ब्रिटनमधील मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी इंटरनॅशनल रिलेशन्स अॅण्ड पॉलिटिक्स या विषयावर मास्टर्स डिग्री प्राप्त केली. अपर्णा व प्रतीक यांचा विवाह मुलायमसिंह यांच्या सैफई गावी डिसेंबर २०११मध्ये झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अपर्णाला पक्षाची उमेदवारी पाहिजे होती. पण ती न मिळाल्याने अपर्णा यांनी भाजपचे दरवाजे ठोठावले. प्रतीक यादव यांचे काका प्रमोदकुमार गुप्ता यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुलायमसिंह हे सपाचे सर्वेसर्वा असताना आणि साधना या पक्षात शक्तिमान केंद्र असताना प्रमोद यांनी २०१२मध्ये सपाचे उमेदवार म्हणून कन्नोज जिल्ह्याच्या बिधूना येथून विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.


विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अपर्णा यांना उमेदवारी देणार का, याचे उत्तर काही दिवसांतच मिळू शकेल. पण मुलायमसिंह यादव घराण्यात फूट पडली आहे, हे दाखविण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. अखिलेश यादव यांनी अपर्णा यांना भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. समाजवादी पक्षाची विचारसरणी भाजपमध्ये पसरत आहे, याचा आपणास आनंद होतो आहे…, अशी त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.


राज्यात निवडणुकीनंतर सपाचे सरकार आले, तर कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, यासाठी अपर्णाने मुलायमसिंह यांच्यामार्फत अखिलेशवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. साधना यादव यांच्याशी संबंधित असलेल्या सर्वांना भेटणे अखिलेश यांनी बंद केले आहे, असे त्यांचे निकटवर्तीय आता सांगत आहेत. अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशामुळे सपामध्ये फूट पडल्याचे भाजप भासवत आहे. पण त्यात मुळीच तथ्य नाही, असे अखिलेशचे समर्थक सांगत आहेत. ज्यांना आपले कुटुंब संभाळता येत नाही, ते राज्य काय संभाळू शकणार, असा प्रश्न भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी विचारला आहे.


काही दिवसांपूर्वी भाजपचे तीन मंत्री समाजवादी पक्षात सामील झाले व अखिलेश यादव यांनी भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचा शो केला होता. पण अपर्णा यादवच्या भाजप प्रवेशाने मुलायमसिंह यादव घराण्यातच फूट पडल्याचे देशाला दिसून आले. मुलायमसिंह यांची दुसरी पत्नी साधना यांचा यादव परिवारात प्रवेश झाल्यापासून अखिलेश आणि मुलायमसिंह पिता-पुत्रात दुरावा निर्माण झाला. मुलायमसिंह यांचे राजकीय वारस केवळ अखिलेश असतील व प्रतीक यांनी राजकारणात प्रवेश करू नये, तसेच जी काही मालमत्ता होती, त्याचे दोन भावांमध्ये समसमान वाटप करावे, असा समझोताही झाला. साधना यादव यांच्या परिवाराचा खर्च सपा उचलेल, असेही ठरले. आपण राजकारणात येणार नाही, असे प्रतीक यादव सतत म्हणत असत. पण अपर्णा यांनी राजकारणात यावे की नाही, याचा निर्णय मुलायमसिंह आणि स्वत: अपर्णा करील, असे ते सांगत. यादव परिवारातील दुसऱ्या सुनबाई डिम्पल यादव यांच्याप्रमाणे आपल्यालाही अधिकार मिळावेत, अशी मागणी अपर्णा यांची असे. म्हणूनच मुलायमसिंह यांनी २०१७मध्ये अपर्णाला लखनऊ कॅन्टोन्मेंटमधून पक्षाची उमेदवारी दिली होती. पण अपर्णाने निवडणूक जिंकावी, असे अखिलेश यांना मुळीच वाटत नव्हते. अपर्णा यांनी गेल्या काही वर्षांत मोदींची अनेकदा प्रशंसा केली, योगींची भेट घेतली. अयोध्येतील राम मंदिरासाठी स्वत: अकरा लाख रुपये दान केले. २०१६मध्ये काका – पुतण्या वाद झाला, तेव्हा अपर्णा यांनी अखिलेश विरोधात शिवपाल चाचांना साथ दिली होती. आता छोट्या बहूचे भवितव्य योगी आणि मोदींच्या हाती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -