वर्धा : येथील सेलसुरा नजीक झालेल्या अपघातात सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कारचाही समावेश आहे. मृतांमध्ये निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) यांचा समावेश आहे.
मृतक २५ ते ३५ वयोगटातील
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा-देवळी मार्गावर सोमवारी रात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघातात घडला. परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकाला धडकून गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास ४० फूट खोल दरीत गाडी पडल्याने गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्याने वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले की, सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्री आणण्यात आले. यात तिरोडा येथील आमदारांचा मुलगा असल्याची चर्चा अपघातस्थळी मदत करणाऱ्यांमध्ये होती. सातही मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.