शिबानी जोशी
मुंबईत संघ स्वयंसेवकांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतलेलं आहे. पूर्व प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयांपर्यंच शिक्षण या संस्था देत आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची आणि १४ विविध शाळा कॉलेजांचं जाळं निर्माण केलेली संस्था म्हणजेच ‘उपनगर शिक्षण मंडळ’. श्रीराम मंत्री हे बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक. १९४८ साली सरकारनं संघावर बंदी आणली. त्या विरोधातील आंदोलनात श्रीराम मंत्री सहभागी झाले होते. त्यांना सात महिन्यांचा कारावास झाला. या काळात त्यांना तिथे अनेक समवयस्क शिक्षकमित्र भेटले. तेथील सततच्या चिंतनात एक विचार नक्की झाला की, बंदिवासातून बाहेर पडल्यानंतर मुलांना राष्ट्रीय विचाराचे संस्कार देण्यासाठी शैक्षणिक संस्था सुरू करावी आणि ज्ञानदानाचे काम करावं. मुलांना राष्ट्रप्रेम, संस्कार आणि स्वावलंबन शिकवावे. श्रीराम मंत्री यांनी अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यामुळे त्यांना वंचितांच्या शिक्षणासाठी काहीतरी काम करावं, असं प्रकर्षानं वाटत होतं. कारावासातून बाहेर आल्यावर लगेचच ही गोष्ट होऊ शकली नाही. कारण मनुष्यबळ, आर्थिकबळ तसंच जागाही नव्हती; परंतु नंतर ‘वंचितांसाठी शिक्षण’ हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून १९५६ साली श्रीराम मंत्री यांनी समविचारी मित्र व शिक्षकांना घेऊन उपनगर शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली.
लगेच १९५७ मध्ये जून महिन्यात अंधेरी भागात रात्रशाळा सुरू करण्यात आली. महापालिकेच्या शाळांच्या वर्गखोल्या रात्रशाळेसाठी भाड्याने मिळवल्या. अनेक तडफदार, तरुण शिक्षकमित्र बरोबरीला होतेच. मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा असेल, तर कोणत्याही श्रमाला यश मिळतच. या यशाने प्रभावित होत लगेच १९६१ साली सांताक्रूझला विकास रात्र विद्यालय सुरू केलं. आजही साठ वर्षांनंतर या दोन्ही रात्रशाळा सुरू आहेत आणि दोन्ही शाळांत साधारणत: ९० मुलं दरवर्षी शिक्षण घेत आहेत. हे शिक्षण जवळजवळ विनामूल्य असतं. रात्री दमून-भागून आलेल्या १५ ते ५५ वयोगटातील मुलांसाठी गेले काही वर्षं एका एनजीओच्या सहकार्याने नाश्ताही विनामूल्य दिला जातो. त्याशिवाय रात्रशाळेतील या मुलांना संगणक आणि विज्ञान नीट शिकता यावं म्हणून शनिवार, रविवारी विद्यानिधीमध्येही नेण्यात येतं.
संस्थेचं काम पाहून १९७० साली जुहू स्किम येथे एक भूखंड मिळाला. १९७१पासून दरवर्षी पैसे जमवत दोन-दोन वर्गखोल्या बांधत शाळेची सुरुवात केली. सचोटी व ध्येयनिष्ठा पाहून देणगीदार मिळत गेले. आज हीच विद्यानिधीची भव्य वास्तू झाली आहे. सर्व पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असं हे भवन सामान्य मुलांना असामान्य बनविण्यास सज्ज असतं.
१९८८मध्ये मंडळाला दुसरा भूखंड प्राप्त झाला आणि संस्थेचा विस्तार झाला. आज दोन रात्रशाळा, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण आणि विज्ञानाचे कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई विद्यापीठाशी संलग्न वास्तुशास्त्राचं महाविद्यालय, संस्थाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संगणक संस्था, पदवीधरांना प्रगत अभ्यासक्रम शिकवण्यासाठी स्वतंत्र इन्फोटेक संस्था आहेत. यात ४८०० विद्यार्थी, १५०हून अधिक शिक्षक/प्राध्यापक आहेत. दोन मोठी सभागृह, समृद्ध ग्रंथालय, तीन अद्ययावत प्रयोगशाळा, भाषिक प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, व्यायामशाळा, ३५० संगणकांचं केंद्र यांचा समावेश आहे. वंचितांचे शिक्षण, संस्कार शिक्षण, आत्मनिर्भरता आणि नावीन्याचा अंगीकार ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. संगणकाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर ११००० चौरस फूट जागेत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं. वंचित मुलांना शिक्षणानंतर लगेच कमावता यावे, यासाठी व्यवसायाभिमुख उपक्रम सुरू करण्यात आले. या मुलांच्या प्लेसमेंटकडेसुद्धा संस्था लक्ष देते. वाणिज्य आणि विज्ञान यांचीही कनिष्ठ विद्यालयं सुरू करून सामान्य मुलांच्या शिक्षणाची सोय संस्थेने केली.
२००१ साली विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीची स्थापना झाली. येथे सी डॅकचा आठ महिन्यांचा कोर्स सुरू केला गेला. यात १२० मुलांची बॅच असते. ५० विद्यार्थ्यांच्या बॅचचा डेटा सायंसचाही सी-डॅक कोर्स सुरू केला आहे. या सर्व ॲडमिशनसाठी कॉमन एंट्रन्स एक्झाम असते. पॅन इंडियाचा विचार करता विद्यानिधी ही या कोर्समध्ये सर्व संस्थांमधून पहिल्या क्रमांकावर आहे. सीडॅकसाठी मुलांची प्रायोरिटी विद्यानिधीलाच असते. येथून उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना गेली १० वर्षं १०० टक्के नोकऱ्या मिळाल्या आहेत.
१९९२ साली आर्किटेक्चर कॉलेज सुरू केलं. ते आज मुंबईतील एक नावाजलेलं कॉलेज आहे. येथे ॲडमिशन घेण्यासाठी मुलं नेहमीच धडपडत असतात. मंडळाला या वाटचालीत चांगलं समुपदेशन करणारी अनेक ज्येष्ठ मंडळी लाभली. के. टी. मंत्री, प्राध्यापक व्ही. जी. राव,
जे. पी. नाईक यांनी प्रयोगशीलतेचा आणि समाजाभिमुखतेचा आदर्श मंडळाला दिला. विद्यानिधी संकुल सातत्याने नवनवीन कल्पनांचा वेध घेऊन ते राबवण्याचा प्रयत्न करत असते. ६५ वर्षांच्या या शैक्षणिक संस्थेला अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत. जैन महामुनी चित्र भानुजी, सिंधी विचारवंत दादा वासवानीजी, सूश्री प्रेमा पांडुरंग, विजय कौशलजी महाराज, साध्वी ऋतंबरा जी, महामंडलेश्वर स्वामी काशीकानंद तसंच रा. स्व. संघाचे पूर्वसहकार्यवाह भाऊराव देवरस, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचा पदस्पर्श विद्यानिधीला लाभला आहे. आज पद्मनाभ आचार्य संस्थेचे अध्यक्ष असून रमेश मेहता उपाध्यक्ष, तर संजीव मंत्री कार्याध्यक्ष आहेत. डॉ. कीर्तीदा मेहता या कार्यवाह, तर विनायक दामले हे कोषाध्यक्ष आहेत.
पद्मनाभ आचार्य जेव्हा नागालँडमध्ये राज्यपाल होते, त्यावेळी ईशान्येकडेही शैक्षणिक उपक्रम राबवावेत, या हेतूने काम करण्याचा विचार पुढे आला आणि म्हणून आर्किटेक्चर काॅलेजचे दोन विद्यार्थी नागालँडमध्ये ट्रायबल विभागात जाऊन साठ दिवस राहिले. त्यांनी तिथला अभ्यास केला आणि तिथे एक कम्युनिटी सेंटरचा प्लॅन काढून त्यांना दिला. अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड या ईशान्येकडच्या भागातल्या शाळांमध्ये विद्यानिधीच्या कला, आयटी आणि विज्ञान शिक्षकांनी प्रशिक्षण दिलं आणि आजही लिंकेजच्या माध्यमातून तिथल्या मुलांना विद्यानिधी मार्गदर्शन देत आहे. ईशान्यपूर्वेचे विद्यार्थीही विद्यानिधीला भेट देऊन गेले आहेत.
नाट्यदिग्दर्शक मंगेश कदम, संगीतकार साजिद-वाजिद असे अनेक कलाकार विद्यानिधीचे विद्यार्थी आहेत. यापुढे संस्थेला स्किल डेव्हलपमेंटमध्ये पुढे जायचं आहे. पण शिक्षणाची व्यावसायिक इंडस्ट्री करायची नाही, हे नक्की आहे. समाजाभिमुखता राखायची आहे. संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संस्थेतल्या कोणत्याही शाळेत/काॅलेजात अॅडमिशन घेण्यासाठी कुठलंही डोनेशन घेतलं जात नाही. खरंतर विद्यानिधी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मुलं धडपडत असतात; परंतु अगदी मॅनेजमेंट कोट्यातील जागासुद्धा मेरिटप्रमाणे विदाऊट डोनेशन भरल्या जातात. वंचितांच्या शिक्षण स्पॅान्सरशिप करता मात्र ही मंडळी झोळी घेऊन फिरतात. इथे मंडळाला भविष्यातील वेध घेणारी बुद्धिमत्ता, चिंतनशीलता, प्रयोगशीलता यांच्या सहाय्याने क्रांतिदर्शी वाटचाल करत राहायची आहे.