नववर्षाच्या पार्श्वभूमीवरील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताच्या क्रिकेट संघाला रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रत्येकी तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय (वनडे) मालिका, असे या दौऱ्याचे स्वरूप होते. त्यात पारंपरिक पाच दिवसांच्या क्रिकेट प्रकारात १-२ अशा फरकाने पराभव झाला. तसेच झटपट मालिकेत व्हाइटवॉशची (०-३) अशी नामुष्की ओढवली. या दौऱ्याआधीच्या आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत (रँकिंग) भारत तिसऱ्या स्थानी आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानी होता. वनडेत उभय संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. रँकिंगमधील फरक पाहता भारताचे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वरचे स्थान होते. प्रत्येक संघाचे मायदेशात पारडे जड असते, कारण तेथील खेळपट्ट्या आणि वातावरणाची त्यांना पूर्ण माहिती असते. पाहुण्या संघाला जुळवून घेणे थोडे जड जाते. तरीही प्रतिस्पर्धी संघाकडून चुरशीची लढत अपेक्षित असते. तुलनेत वरचे रँकिंग असून भारताने चुरशीची लढत दिली नाही, याचे शल्य वाटते.
भारताने आजवर आठ वेळा दक्षिण आफ्रिकेवर स्वारी केली आहे. मात्र त्यात एकदाही जिंकता आलेले नाही, यात २०१०-११ दौऱ्यातील १-१ बरोबरी हीच पाहुण्या संघासाठी थोडी दिलासादायक बाब आहे. उर्वरित सात मालिकांमध्ये यजमानांना रोखण्यात भारताला अपयश आले आहे. यावेळचा पराभव हा भारताचा आफ्रिका खंडातील सलग तिसरा कसोटी मालिका पराभव आहे. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील यजमान संघाने २-१ अशा फरकाने बाजी मारली तरी पहिला सामना भारताने जिंकला होता. मात्र उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवत यजमानांनी बाजी पलटवली. पिछाडी भरून काढण्यासह मायदेशातील मालिका विजयाची परंपरा कायम राखली.
आयपीएल तसेच झटपट सामन्यांची वाढती संख्या पाहता भारताचा संघ कसोटी मालिकेतील अपयश धुऊन काढेल, असे वाटले होते. मात्र क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली. भारताला तीनपैकी एकही सामना जिंकता आला नाही. हार-जीत हा खेळाचा भाग आहे. मात्र पराभवातून बोध घ्यायला हवा. चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी. शिवाय पराभवातही शान असायला हवी. प्रतिस्पर्ध्यांना सहजासहजी जिंकू द्यायला नको. दोन वेळच्या जगज्जेत्या संघामध्ये हे अभावाने पाहायला मिळाले. खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यास कुठल्याही दौऱ्यातील सुरुवातीचे सामने जिंकणे कठीण जाते. मात्र पहिला कसोटी सामना जिंकून भारताने धडाकेबाज सुरुवात केली होती. तरीही त्यांना मात खावी लागली. दुसरीकडे, यजमान दक्षिण आफ्रिकेने खेळ उंचावला, याहून पाहुण्या संघाने सपशेल शरणागती पत्करली, हे पचवणे कठीण जात आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मालिका पराभवाची अनेक कारणे आहेत. मात्र क्रिकेट किंवा कुठल्याही सांघिक खेळात अमुक एका क्रिकेटपटूला अपयशासाठी जबाबदार ठरवता येत नाही. त्यामुळे पराभवाला अमुक एक नव्हे संपूर्ण संघ कारणीभूत आहे.
कर्णधारपद निवडीचा सावळा-गोंधळ व प्रमुख क्रिकेटपटूंचे अपयश हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपआधी नियोजित कर्णधार विराट कोहलीचा याच प्रकारातील नेतृत्व सोडण्याचा निर्णय त्याच्यासह सर्वांनाच गोंधळात टाकणारा ठरला. त्याच्या निर्णयामुळे वर्ल्डकपमधील कामगिरी पाहता भारताचा संघ कॅप्टनविना खेळला, असेच म्हणावे लागेल. त्या ‘फ्लॉप शो’ची इथे उजळणी व्हावी, असे वाटत नाही. मात्र विराटने कॅप्टन्सी सोडल्यानंतरच्या मैदानाबाहेरच्या घडामोडींचा (ऑफ द फिल्ड) भारतीय क्रिकेटपटूंच्या मनोबलावर प्रतिकूल परिणाम झाला. टी-ट्वेन्टी कर्णधारपद सोडले म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराटकडून वनडेतील कर्णधारपदही काढून घेतले. झटपट क्रिकेटमधील दोन्ही संघांची धुरा सलामीवीर रोहित शर्माकडे सोपवली. वनडे कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर कोहलीने बीसीसीआयवर टीका केली. अशा गढूळ वातावरणातही भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. त्यातच सरावादरम्यान दुखापत झाल्याने रोहित शर्मा संपूर्ण दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. कर्णधारपदाच्या अनोख्या नाट्याचा पुढील अंक म्हणजे दुसरी कसोटी आणि संपूर्ण वनडे मालिकेत लोकेश राहुलला हंगामी कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडावी लागली. राहुलने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व सांभाळले तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा मोठा अनुभव नाही. कसोटी मालिका पराभवानंतर कोहलीने या प्रकारातील नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे कर्णधारपदाच्या घोळामध्ये आणखी भर पडली. कुठल्याही संघासाठी नेता महत्त्वाचा असतो. त्यामुळे नेतृत्व बदल आणि त्यानंतरच्या घडामोडींचा अप्रत्यक्ष परिणाम सांघिक कामगिरीवर झाला.
वैयक्तिक कामगिरीचा विचार करता माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा यांना सहा डावांमध्ये केवळ एकदा पन्नाशी पार करता आली. दोन सामन्यांत खेळलेला कर्णधार कोहलीही चार डावांत एकदाच अर्धशतक झळकावू शकला. अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विन हाही बॉलर म्हणून अपयशी ठरला. कसोटीनंतर वनडेतही लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात भारताला यश आले नाही. त्यामुळे तिन्ही सामन्यांत सपाटून मार खावा लागला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा संघ हरला, त्यापेक्षा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पहिल्याच परदेश दौऱ्याची सुरुवात दारुण पराभवाने झाली, याचे अधिक दु:ख वाटते. द्रविड महान फलंदाज आणि निष्णांत कोच आहेत; परंतु संघातील क्रिकेटपटू त्यांची जबाबदारी ओळखून खेळत नसतील, तर कोच तरी काय करणार? भारताच्या पराभवाची चिरफाड व्हायलाच हवी. मात्र भारतीय कसोटी संघाच्या पुनर्बांधणीची वेळ आली आहे, हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर अधोरेखित झाले आहे.