श्रीशा वागळे
भारत हा बहुविध भाषा आणि संस्कृतींनी नटलेला देश. भारतीय माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी आपल्या मातीशी घट्ट जोडलेला असतो. आपल्या भाषेतलं काही तरी पाहायला, अनुभवायला मिळावं, असं त्याला वाटत असतं. हिंदी, इंग्रजी भाषा त्याच्या कानांवर सतत आदळत असते. हिंदी, इंग्रजीतले चित्रपट, मालिका तो बघतो. पण शेवटी मायेचा ओलावा मिळतो, तो आईच्या कुशीतच. मातृभाषा ही प्रत्येकाची आईच असते. मातृभाषेत आपण अगदी सहजपणे व्यक्त होऊ शकतो. एकेकाळी भारतीय दूरचित्रवाणीवर हिंदी आणि इंग्रजी वाहिन्यांचं राज्य होतं. या वाहिन्यांची मक्तेदारी मोडत असंख्य प्रादेशिक वाहिन्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं. विविध भाषांमधले दर्जेदार कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. प्रादेशिक वृत्तवाहिन्या सुरू झाल्या. लोकांना आपल्या राज्यातली खबरबात कळू लागली. देशात तंत्रज्ञानाचं युग सुरू झालं. स्मार्टफोन आले. इंटरनेट अगदी स्वस्तात उपलब्ध होऊ लागलं आणि ओटीटी वाहिन्यांचा शिरकाव झाला. टीव्हीवरील वाहिन्यांप्रमाणे वेबवाहिन्या आल्या. एकेकाळी फक्त नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमपुरतं मर्यादित असणारं भारतातलं वेबविश्व विस्तारू लागलं. आजघडीला भारतात चाळीसहून अधिक वेबवाहिन्या असून त्यापैकी दहा ते बारा वाहिन्या प्रादेशिक भाषेतल्या आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात वेबवाहिन्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बदलून गेलं आहे.
आज प्रेक्षकांना तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी, गुजराती, पंजाबी, उडिया, बंगाली, भोजपुरी आदी भारतीय भाषांमधले कार्यक्रम घरबसल्या पाहायला मिळत आहेत. या भाषांमधल्या वेबवाहिन्या दर्जेदार कथानकं असणाऱ्या वेबसीरिज घेऊन येत आहेत. प्रादेशिक भाषांमधले नावाजलेले कलाकार वेब वाहिन्यांवरील मालिका, कार्यक्रम करत आहेत. नेहमीच्या रटाळ, एकसुरी कार्यक्रम तसंच मालिकांपेक्षा काही तरी वेगळं पाहायला मिळेल या आशेने प्रेक्षकही प्रादेशिक भाषांमधल्या वेब वाहिन्यांकडे वळला आहे आणि त्याच्या या अपेक्षा बऱ्याच अंशी पूर्ण होताना दिसत आहेत. हिंदी, इंग्रजी वेबसीरिजमधला बोल्डनेस प्रादेशिक भाषांमधल्या कार्यक्रमांमध्येही दिसू लागला आहे. या वाहिन्यांवर प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांची जादू अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. यासोबतच त्यांना अस्सल असं काही तरी पाहायला मिळतं. भारतात येत्या काळात ओटीटी व्यासपीठावरील कार्यक्रमांची बाजारपेठ विस्तारत जाणार आहे. २०२४ पर्यंत भारतातल्या ओटीटीच्या बाजारपेठेतल्या उलाढालीने २.९ अब्ज डॉलर्सचा आकडा गाठलेला असेल. प्रेक्षकही दिवसातले अनेक तास या ओटीटी वाहिन्यांवर घालवतील, असा अंदाज आहे. मध्यंतरी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार २०२५पर्यंत ओटीटी वाहिन्यांवर खर्च होणाऱ्या एकूण वेळेपैकी ५० टक्क्यांहून अधिक वेळ प्रादेशिक ओटीटी वाहिन्यांवर खर्च होणार असल्याचं दिसून आलं आहे. यावरूनच प्रादेशिक कथानकांना ओटीटीच्या बाजारात किती मागणी आहे हे आपल्या लक्षात येईल.
मागील वर्षभराच्या काळात भारतात २५०० तास बघता येईल, असा अस्सल प्रादेशिक कंटेंट तयार झाला. येत्या दोन वर्षांमध्ये हा कालावधी ४५०० तासांवर जाण्याचा अंदाज आहे. आजघडीला निर्माण होणाऱ्या एकूण ओटीटी कार्यक्रमांपैकी ५० ते ६० टक्के कार्यक्रम प्रादेशिक भाषांमधले असतात. साधारण तीन वर्षांपूर्वी हा आकडा २० टक्क्यांपेक्षा जास्त नव्हता. आज आपल्याकडे सलग दोन महिने चोवीस तास बघता येईल एवढा प्रादेशिक कंटेंट उपलब्ध आहे. आज देशातल्या फक्त २५ टक्के लोकांपर्यंत ओटीटी वाहिन्या पोहोचल्या आहेत. तरीही प्रादेशिक वाहिन्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
प्रादेशिक ओटीटी वाहिन्यांनी आपल्या प्रेक्षकांची नस अगदी नीट ओळखलेली असते. कथानकं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य त्यांनी विकसित केलेलं असतं. म्हणूनच राष्ट्रीय किंवा जागतिक स्तरावरील ओटीटी वाहिन्यांनी नाकारलेला एखादा चित्रपट प्रादेशिक वाहिन्यांवर हिट ठरतो. ‘नीस्ट्रिम’ या मल्याळम ओटीटी वाहिनीने ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा गाजलेला चित्रपट दाखवला आणि मोठी प्रेक्षकसंख्या जोडली. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हाच प्रादेशिक ओटीटी वाहिन्यांच्या यशाचा मंत्र आहे आणि हेच ओटीटी वाहिन्यांपुढचं मोठं आव्हान आहे.
‘अॅमेझॉन प्राइम’ने दक्षिणेतली मोठी बाजारपेठ काबीज करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. कोरोनाकाळात ‘अॅमेझॉन प्राइम’ने १२० ते १५० कोटी रुपये चित्रपटांवर खर्च केल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. यात तमीळ भाषेतल्या ‘सुराराई पोट्टरू’ या चित्रपटाचाही समावेश आहे. ‘नेटफ्लिक्स’नेही धनुषच्या ‘जगामे थंडीराम’ आणि ‘नवरस’च्या माध्यमातून दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात प्रवेश केला खरा. पण त्यांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’नेही तमीळ आणि तेलुगू भाषेतले चित्रपट आणि कार्यक्रम आणले. ‘झी फाइव्ह’नेही तमीळ आणि तेलुगू भाषेतला कंटेंट दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर त्यांनी बंगाली बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. ‘झी फाइव्ह’ची अर्ध्यापेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या प्रादेशिक आहे.
आज प्रेक्षकांना उत्तम आणि दर्जेदार असं काही तरी हवं आहे. प्रादेशिक साहित्यात ही ताकद नक्कीच आहे. गरज आहे ती साहित्य सागरातले मोती वेचून ओटीटी व्यासपीठांच्या प्रेक्षकांना भावतील अशा कलाकृती निर्माण करण्याची. अशा कलाकृती येत्या काळात नक्कीच तयार होतील आणि प्रादेशिक प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.