सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना-भीमा नदीच्या खोऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. पण महामारी वाढत असल्याने मंद्रूप येथे लोकहभागातून कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. मी स्वत: पगारातून मदत करीत आहे. पण लोकहितासाठी स्थानिक प्रशासनासह, दानशूरांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी केले.
मी सुरक्षित, माझं गाव सुरक्षित अभियानांतर्गत विविध क्षेत्रांतील मान्यवरांची बैठक तहसीलदार लिंबारे यांनी घेतली. दक्षिणच्या सीना-भीमा नदीच्या खोऱ्यातील मंद्रूप हे सर्वात मोठ्या लोकवस्तीचे मध्यवर्ती गाव आहे. येथे २० पेक्षा अधिक बाधित रुग्ण असून, ती संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी निंबर्गी रस्त्यावरील जे. डी. पाटील स्कूलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. गावामध्ये कोविड केअर सेंटर असल्याने बाधित उपाचारासाठी दाखल होतील. तसेच रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.