हिंगोली : मागिल काही महिन्यांपासून माघारी परतलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा हिंगोली राज्य राखीव पोलीस दलात शिरकाव केला आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. यवतमाळच्या पुसद शहरात कर्तव्य बजावून परतलेल्या ५७ पोलीस जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंगोली राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपी) हे जवान बंदोबस्त कामी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, यातील अनेक जवानांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने राज्य राखीव पोलीस दलाने बंदोबस्त करुन माघारी परतलेल्या या १६९ पोलीस जवानांची कोरोना टेस्ट केली. ज्यात तब्बल ५७ जवान बाधित आल्याची माहिती हिंगोलीच्या आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, या जवानांना सध्या हिंगोलीच्या शासकीय विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राज्य राखीव पोलीस दलातून हद्दपार झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केल्याने जवानांच्या कुटुंबीयांसह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. आज घडीला हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ८५५ वर पोहचला आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.