नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शाळा आज सोमवार पासून पुन्हा एकदा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. मात्र आठवी पेक्षा लहान वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्याही अत्यल्प होती. यावेळी शाळा सुरू झाल्यानंतर विशेष म्हणजे शाळांमध्ये लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने पालक हे शिक्षक शाळा सुरू करण्याची मागणी सतत करत होते. यापूर्वी राज्य शासनाने ओमायक्रोन आणि कोरोना महामारीचे रुग्ण वाढू लागल्यामुळे १० जानेवारी पासून शाळा बंद केल्या होत्या. त्यामुळे राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या ३२६७ शाळा, ग्रामीण भागांमध्ये खाजगी संस्थांच्या ६६६ तर नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या ९७ आणि खाजगी २४५ शाळा अशा एकूण पाच हजार शाळा जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला असला तरी जिल्ह्यामध्ये आणि खास करून नाशिक शहरामध्ये आठवीपेक्षा खालील वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प होती. आठवी, नववी व दहावीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित होती. शिक्षकही शाळेमध्ये दाखल झाले आहेत.
राज्याप्रमाणे नाशिकमध्येही शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या आदेशांमध्ये विसंगती दिसत आहे. त्यामुळे नक्की कोणत्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे याबाबत शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून कोणत्याही नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून सोमवारपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये नेहमी शाळा सुरू झाल्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाच्या या सगळ्या गोंधळामुळे शिक्षण विभागात काम करणाऱ्या अधिकारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावेळी राज्य शासन आणि केंद्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे यावेळी शाळा सुरू झाल्यानंतर १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याकडे बहुतेक शाळांचा कल दिसत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लस मिळावी या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत.