
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूबाबत सातत्याने संशोधन सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात उच्च रक्तदाबाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे काही अहवालांमधून समोर आले आहे. सर्क्युलेशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोरोना महामारीच्या काळात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केले असून कोरोना महामारी अप्रत्यक्षपणे जीवनशैलीशी संबंधित व्याधींमध्ये भर घालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे कोरोनाची लागण न होताही लोकांना उच्च रक्तदाब जडताना दिसत आहे.
या संशोधनात सरासरी ४५.७ वर्षे वय असणारी जवळपास पाच लाख माणसे सहभागी झाली होती. संशोधकांनी त्यांची २०१८ ते २०२० या काळातल्या रक्तदाबाच्या पातळीची नोंद घेतली. त्यातून त्यांच्या असे लक्षात आले की कोरोना महामारी सुरू होण्याआधीच्या वर्षांमध्ये या लोकांच्या रक्तदाबाच्या पातळीत फारसे बदल झाले नव्हते. मात्र कोरोनाकाळात त्यांचा रक्तदाब मोठ्या प्रमाणावर वाढला. इतकंच नव्हे, तर वयाने अधिक असणाऱ्या लोकांचा उच्च रक्तदाब वाढल्याचे तर कमी वयाच्या लोकांचा लो ब्लड प्रेशरचा त्रास वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोरोनाकाळात जीवनशैलीत कराव्या लागलेल्या बदलांमुळे उच्च रक्तदाबाची प्रकरणे वाढल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसंच रुग्णांची डॉक्टरांकडे न जाण्याची इच्छाही याला कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.
कोरोना महामारीच्या काळात फक्त उच्च रक्तदाबाच्या नाही तर मधुमेह आणि मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोरोनाकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ तसंच बैठ्या जीवनशैलीचा अवलंब वाढल्यामुळे उच्च रक्तदाब जडण्याचे प्रमाण वाढल्याचंही या क्षेत्रातले जाणकार सांगतात. यासोबतच चिंता, वाढलेला ताण यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांसोबतच मानसिक आजारांचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. कोरोना महामारी प्रत्यक्षपणे या आजारांना कारणीभूत ठरली नसली तरी या काळात वाढलेला ताण, चिंता, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी या बाबी जीवनशैलीशी संबंधित व्याधी जडण्यास कारणीभूत ठरल्या आहेत, असेही काही तज्ज्ञ सांगत आहेत.
जीवनशैलीशी संबंधित व्याधी टाळण्यासाठी शक्यतो शाकाहार अंगिकारावा. मांसाहार करणाऱ्यांनी मासे, चिकन खायला हरकत नाही. मात्र लाल मांस खाणं टाळायला हवे. ताण कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, मेडिटेशनवर भर द्यावा, पुरेशी झोप घेणे, आयुष्यात आनंदी राहणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसंच चिंता, भीती किंवा मानसिक आजाराशी संबंधित त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.