नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी झालेली घट क्षणिक ठरली. रविवारी दिवसभरात ४ हजार ६६५ नव्या बाधितांची नोंद झाली. तर नऊ मृत्यू नोंदवण्यात आले. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून चार हजारांहून अधिक दैनंदिन बाधितांची सुरू झालेली नोंद रविवारीही कायम होती. जिल्ह्यात झालेल्या एकूण १३ हजार ३३३ चाचण्यांपैकी दिवसभरात ४ हजार ६६५ नवे बाधित नोंदवण्यात आले. यात शहरात ३ हजार ३९६, ग्रामीणमधील १ हजार १४१, तर जिल्ह्याबाहेरच्या १२८ बाधितांचा समावेश आहे.
शनिवारी जिल्ह्यातील दैनंदिन बाधितांच्या संख्येत साडेसातशे रुग्णांनी घट झाली होती. मात्र, रविवारी पुन्हा एकदा जिल्ह्यातील बाधित संख्येने उसळी घेतली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या २६ हजार १२२पर्यंत वाढली आहे. यात शहरात २० हजार २२८, तर ग्रामीणमध्ये ५ हजार ४८३ आणि जिल्ह्याबाहेरील ४११ सक्रिय रुग्णांचा समावेश आहे.
तर दिवसभरात सात मृत्यू शहरात, तर दोन जिल्ह्याबाहेरचे होते. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजार १७१च्या पुढे गेली आहे. रुग्णवाढीच्या तुलनेत रुग्णालयात उपचारासाठी भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे. असे असले तरी गेल्या आठवडाभरापासून दररोज मृत्यूची नोंद होत आहे. एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाबाधित वाढत असताना रविवारी दिवसभरात २ हजार २३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात सर्वाधिक १ हजार ६९३ शहरात, तर ग्रामीणमधील ४८६ आणि जिल्ह्याबाहेरील ५६ बाधितांचा समावेश आहे.
शहर पोलीसस दलातील पोलीसस उपायुक्तांसह आणखी ४९ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत पोलिस विभागातील एकूण बाधितांची संख्या ६९३ झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून ते गृहविलगीकरणात आहेत, अशी माहिती हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी दिली.