मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात भाजपसोबतच्या युतीत आमची २५ वर्षे सडली, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ‘उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कालच्या भाषणात सोयीचा इतिहास प्रामुख्याने पाहायला मिळाला. २५ वर्षे युतीत सडलो असे ठाकरे म्हणाले. पण २०१०-२०१२ पर्यंत तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे युतीचे नेते होते. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. मग तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयाकडे बोट दाखवत आहात काय?’ असा सवाल फडणवीस यांनी केला. बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे काय, असा आम्हाला प्रश्न पडला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
शिवसेना जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक-आमदार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. तुमचा पक्ष (शिवसेना) जन्माला यायच्या आधी मुंबईत आमचा म्हणजेच भाजपचा नगरसेवक आणि आमदार होता. १९८४ साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढलात आणि हे भाजपसोबत सडलो असे सांगतात. भाजपसोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले, तर भाजपला सोडल्यानंतर हे चौथ्या क्रमांकावर गेले, यावर त्यांनी बोलले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
तुमचं हिंदुत्व भाषणातलं, कागदावरचं!
भाजपचं हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार हे आधीच शिवसैनिकांना कळलं असेल, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. खरं तर आम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या. तुम्ही केवळ तोंडातून वाफा सोडत होतात. राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार होत आहे. तुम्ही साधा दुर्गाडीचा किंवा श्री मलंगगडचा किल्ल्याचा प्रश्न सोडवू शकला नाहीत. भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? असा सवाल फडणवीस यांनी केला. उद्धव यांच्या भाषणात महाराष्ट्र हिताचे असे काही नाही. महाराष्ट्राच्या समस्यांबाबत काही नाही. दिशा काय देणार हे देखील माहिती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना पाहून आलेली निराशा लपविण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीवर टीका करून थयथयाट करत आहेत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे आधीच्या दसऱ्याच्या भाषणासारखेच होते. एखाद्या माणसाला आपली चूक समजली पण मान्य करता येत नसेल तर निराशेतून तो थयथयाट करतो आणि दुसऱ्याला चूक म्हणतो तसा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडला. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेली. तब्बल ४१ नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. या निराशेतून सोडणार नाही, दाखवून देईन, आमच्या जिवावर तुम्ही मोठे झालात असे मुख्यमंत्री बोलत आहेत. पण मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही.
आपण हिंदुत्व सोडले नाही असे उद्धव ठाकरे यांना सांगायचे असेल तर त्यांनी ते काँग्रेसला सांगावे. मौलाना आझाद महामंडळाला निधी वाढवून देता पण अण्णासाहेब पाटील महामंडळाला मात्र निधी देत नाही. त्यामुळे ज्या अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला आहे त्यांनाही हिंदुत्व सोडले नाही असे सांगावे, असा टोला मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी हाणला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत ते पाहता पटोले यांच्या मानसिक तपासणीची गरज आहे. त्यांच्या राजकारणाचा स्तर किती घसरला आहे याचा काँग्रेस पक्षाने विचार करावा. नाना पटोले यांच्या वृत्तीचा आपण निषेध करतो. भाजपातर्फे राज्यात ठिकठिकाणी पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
एका प्रश्नाच्या उत्तरात मा. प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव नाही व तसा काहीही निर्णय झालेला नाही.