पुणे : ओमायक्रॉन विषाणूंचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी ९५ टक्के नागरिक गृहविलगीकरणात आहेत. या नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वॉर रूम तयार केली आहे. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळामुळे पॉझिटिव्ह असलेल्या केवळ ५० ते ५५ टक्के रुग्णांशी संपर्क होत आहे. उर्वरित रुग्णांना संपर्क साधणे कर्मचाऱ्यांना शक्य होत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पहिल्या लाटेपासून महापालिकेने संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी) स्थापन केली. पण रुग्णसंख्या वाढण्यास सुरवात झाल्यानंतर रुग्णांना फोन करून त्यांच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी करून घेण्याच्या सूचना देणारे फोन केले जाऊ लागले. सध्याही याच पद्धतीने काम केले जात आहे. पण दुसरी लाट ओसरल्यानंतर वॉर रुममधील महापालिकेचे शिक्षक, पीएमपीएलचे कर्मचारी हे त्यांच्या मुळ कामासाठी गेले. त्यामुळे सध्या या वॉररूममध्ये एक डॉक्टर आणि एक डेटाएंट्री ऑपरेटर हे दोघेच कार्यरत आहेत.