मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे वृत्त कळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधल्याचे समजते. ‘तुम्ही योद्धे आहात, तुम्हाला लढायचे आहे’, असेही नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना सांगितले.
शरद पवार यांनी सोमवारी स्वत: ट्विट करुन त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली. ‘मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी’, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटद्वारे केली आहे.
कोरोना काळात पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये असल्याचे समजते.