मुंबई : कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले होते. आता मात्र मुंबईमध्ये संसर्गाचा फैलाव अधिक प्रमाणात होत असला तरी त्यात लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात २,२०७ रुग्णांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या १४,७०१ रुग्णांना कोरोना संसर्गाची कोणत्याही स्वरूपाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. मागील दोन वर्षांमध्ये रुग्णसंख्येमध्ये असे पहिल्यांदा दिसून आले आहे. यापूर्वी लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्येमध्ये फार मोठा फरक नव्हता.
मुंबईमध्ये आतापर्यंत १०,३२,२८३ रुग्णसंख्येची नोंद झाली असून त्यापैकी ९,९५,५६९ रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या १७,४९७ असून त्यापैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या १४,७०१ इतकी आहे.
संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. एस. एस. श्रीनिवास यांनी ओमायक्रॉन प्रकारच्या संसर्गाचा फैलाव ज्या देशांमध्ये अधिक आहे, तिथेही लक्षणांची तीव्रता अधिक दिसून येत नाही, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या कोरोनाच्या यापूर्वी आलेल्या दोन्ही लाटांसारखी वेगाने वाढलेली नाही. मुंबईमध्ये ३,१२६ आयसीयू खाटांची उपलब्धता करण्यात आलेली असताना ९८० खाटांवर रुग्ण वैद्यकीय उपचार घेत असून सध्या २,१४६ खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटरची गरज भासत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली असून ५९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यापैकी ९३६ खाटा रिक्त आहेत.