मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाच्या प्रदर्शनास प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनीही विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात नथुराम गोडसे याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये झालेले असून हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्यावरून अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका होत आहे. या सिनेमाविरोधात काँग्रेसही आता मैदानात उतरला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. तसेच आमची ही मागणी मान्य करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या चित्रपटात अमोल कोल्हे हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे कोल्हे हे नथुराम गोडसेच्या विचारांशी सहमत आहेत का? अशी जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील वादामुळे हा चित्रपट रखडला होता. पण त्यांच्यातील वाद समन्वयाने मिटल्यामुळे हा चित्रपट आता पाच वर्षांनी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी नेहमीच नथुराम गोडसेला विरोध करत आली आहे. त्यामुळे कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका करणे हे पक्षाच्या विचारसरणीविरोधात आहे, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळेच अभिनेता आणि सोबतच खासदार असलेल्या अमोल कोल्हेंच्या या चित्रपटाला विरोध होत आहे. अमोल कोल्हे यांनी मात्र हा चित्रपट केला तेव्हा आपण सक्रीय राजकारणात नव्हतो असे स्पष्टीकरण दिले आहे.
३० जानेवारीला प्रदर्शन
महात्मा गांधींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित असून आपल्या देशाची ओळख गांधींजींच्या नावाने होत आहे. सत्य, अहिंसा, सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते, हे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्यातून दाखवून दिले. म्हणूनच संपूर्ण जगभर ते पूजनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून पाळला जात असताना दुसरीकडे अशांतता, द्वेष आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोणत्याही अमानवीय कृत्याचे उदात्तीकरण हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. म्हणून हा चित्रपट राज्यात कोणत्याही चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्याची काँग्रेसची मागणी आहे. ती मान्य करण्यात यावी, असेही पटोले यांनी निवेदनात म्हटले आहे. नथुराम गोडसे याने १९४८ मध्ये महात्मा गांधीजींची हत्या केली. आता यावर्षी ३० जानेवारीलाच गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.