किलबिल : रमेश तांबे
एकदा एका घरात चोर शिरला. चोर कसला महाचोर शिरला. शिरला तर शिरला, त्याने पैशाऐवजी गहू चोरला. डोक्यावर गव्हाचं पोतं घेऊन तो निघाला.कधी चालत, तर कधी पळत. पळता पळता तो खूप दमला आणि एका झाडाखाली थांबला. डोक्यावरचं पोतं खाली ठेवून तो थोडा वेळ पडून राहिला.
तेवढ्यात फांदीवर बसलेल्या दोन चिमण्या बोलू लागल्या…
“कोण बसलंय, कोण बसलंय
झाडाखाली कोण बसलंय?
गरिबा घरचा गहू चोरलाय
तो बसलाय, तो बसलाय!”
चिमण्यांचं गाणं ऐकून चोर सावध झाला. चिमण्यांना कसं कळलं याचा विचार करू लागला. विचार करता करता त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला आणि डोक्यावर पोतं घेऊन तो झपझप निघाला. बराच वेळ चालत गेल्यावर चोराला रस्त्यात दोन बकऱ्या दिसल्या. पण चोराने त्यांच्याकडे जरासुद्धा लक्षं दिलं नाही. चोर जवळ येताच बकऱ्या गाणं म्हणू लागल्या…
कोण चाललंय, कोण चाललंय?
धावत पळत कोण चाललंय?
गव्हाचं पोतं ज्याने चोरलंय
तो चाललाय, तो चाललाय!’
बकऱ्याचं गाणं ऐकून चोराला खात्री पटली. आपण गहू चोरला याची बातमी चिमण्यांनीच बकऱ्यांना दिली असणार! मग त्यांच्याकडे न बघताच चोर जोरजोरात चालू लागला. आता तो चांगलाच घामाघूम झाला होता. भरदुपार असल्याने त्याला तहान लागली होती. पण कुठे पाणी दिसेना की सावली! आपण खूप लांब जायचं, जिथं कुणी ओळखणार नाही, असं चोरानं ठरवलं!
तेवढ्यात समोरून दोन भुंगे उडत येताना दिसले. चोराला वाटले यांना काय माहीत असणार? पण भुंग्यांच्या गाण्याचा आवाज लांबूनच येऊ लागला…!
‘माणसाच्या डोक्यावर आहे काय, आहे काय?
गव्हाचं पोतं आणखी काय, आणखी काय?
गव्हाचं पोतं चोरलंय काय, चोरलंय काय?
गरिबाची पोरं रडतात काय, रडतात काय?’
हे भुंगे माझं काय वाकडं करणार, असं समजून चोर झपाट्यानं चालू लागला. चालता चालता त्यानं मागे वळून पाहिलं, तर काय आश्चर्य…!
दोन चिमण्या, दोन बकऱ्या, दोन भुंगे त्याच्या मागून गाणं म्हणत येत होते. आता मात्र काय करावं? हे चोराला कळत नव्हतं.
आता चोर पळू लागला. गव्हाचं पोतं त्याला खूप जड वाटू लागलं. कधी एकदा लांब जातोय असं त्याला झालं होतं. तेवढ्यात समोरून दोन छोटी मुलं येताना दिसली. चोराकडे बघून ती रस्त्यातच थांबली अन् चोराकडे टकामका बघत गाणं म्हणू लागली…
‘काम न करता बसून राहातो
छोट्या-मोठ्या चोऱ्या करतो
गरिबाघरचे गहू चोरतो
आपल्या पोरांना खाऊ घालतो!’
आणि पोरं खो खो हसू लागली. चोराने नीट पाहिलं तर ती त्याचीच पोरं होती. त्याने पोरांना, ‘ए सोन्या, ए गुण्या’ अशा हाका मारल्या. पण पोरं बापाला ओळखतच नव्हती. ही भुताटकी तर नाही ना असं चोराला वाटू लागलं. आता दोन चिमण्या, दोन बकऱ्या, दोन भुंगे आणि दोन मुले त्याच्या मागून गाणे म्हणत येऊ लागली…!
तसा चोर थांबला. आता पळून तरी काय फायदा? आपल्या मुलांनाही आपण चोरी केलेली आवडत नाही म्हणून तो मागे फिरला. पाहतो तर काय….! चिमण्या, बकऱ्या, भुंगे आणि मुले तिथून गायब झाली होती. त्या गरिबाचे गहू त्याला परत देऊ. त्याची पाय धरून माफी मागूया, असं त्यानं ठरवलं.
तो आता चोर राहिला नव्हता, तर चांगला माणूस झाला होता! गरिबाच्या झोपडीत गव्हाचं पोतं ठेवून त्याने गरिबाची माफी मागितली. ‘यापुढे चोरी करणार नाही, मेहनत करीन, कष्ट करीन, घाम गाळीन आणि मगच आपल्या मुलाबाळांना भरवीन!’ गहू मिळाले, गरीब माणूस खूश झाला. चांगला मार्ग सापडला, चोर खूश झाला.
आता मन करा घट्ट, कारण संपली माझी गोष्ट!