स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील
कोरोना अाला आणि खरी कसोटी लागली ती घराघरांतील कारभारणींची. काहींनी घराला हातभार लावावा म्हणून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला, तर काहींनी आपापल्या परींनी घर सावरण्याचा प्रयत्न केला. पण घरात बसून अगदीच वेळ जाईना म्हणून काहींनी चक्क सोशल मीडियाचा वापर करून त्या यूट्यूबच्या माध्यमातूनच घराघरांत झळकल्या. व्लॉगच्या माध्यमातून गृहिणी यूट्यूबर बनल्या आणि घराघरांत पोहोचल्या.
आम्हाला घरातल्या कामांतून जराही उसंत मिळत नाही. काम एवढं असतं की, स्वत:साठी वेळच मिळत नाही, असा समज करून घेणाऱ्या गृहिणींसाठी या यूट्यूबर्स अगदी आदर्शच ठरतील, असे म्हणायला हरकत नाही. कारण यांचा उत्साह पाहून पाहणाऱ्यालाही अापले यूट्यूब चॅनेल सुरू केल्यावाचून राहवणार नाही. या यूट्यूबर गृहिणींचे सातत्य आिण उत्साह पाहिला तर लक्षात येते की, या आज इथवर का पोहोचल्या आहेत ते.
ज्यांनी आपल्यातील उपजत गुणांना वाव दिला, आपली भाषाशैली, घर सजवण्याची पद्धती, विणकाम, शिक्षण आदींच्या माध्यमातून त्या अगदी घराघरांत जाऊन पोहोचल्या.
काही यूट्यूबर्सचे चॅनल्स हे सुरुवातीपासूनच होते, तर काहींनी कोरोना काळातच घरात वेळ जाईना म्हणून सुरू केले. त्यांना खरे व्ह्युवर्सदेखील मिळाले ते कोरोना काळातच. कारण नोकरी सोडलेल्या, घरात बसलेल्या कारभारणींनाही पाककलेचे उत्तम पदार्थ पाहण्यासाठी यूट्यूबचाच अाधार वाटू लागला आिण यूट्यूबर्सच्या यादेखील नेहमीच्या व्ह्युवर्स बनून राहिल्या.
टीव्हीवर एखादी मालिका पाहावी तशीच या यूट्यूबर्सची वाट पाहणारी काही मंडळी आहेत. जी कमेंटमधून व्यक्त होताना दिसतात.
रोज एक व्हीडिओ बनवून यूट्यूबवर व्लॉग बनविणाऱ्या महिलांचा उत्साह पाहिला, तर ही मंडळी खऱ्या अर्थाने एक पाऊल पुढे असल्याचेच दिसून येते. आम्हाला लाइक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. हे वाक्य अनेकदा आपल्या कानी पडते. याच वाक्याच्या माध्यमातून अनेक गृहिणींनी पाककला, हस्तकला, मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट वापरायचे, आरोग्याच्या टिप्स, आयुर्वेद, गायन, बिर्याणी कशी बनवावी, विविध पदार्थांची रेलचेल आदीतून यूट्यूबच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे, तर कोरोना काळात ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल शिकवण्या घेऊनही काही गृहिणी यूट्यूबच्या माध्यमातून दाखल झाल्या आिण त्यांना प्रतिसादही तितकाच मिळाला.
फूड व्लॉगरमध्ये गृहिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज इतक्या पुढे आल्या आहेत की, कोणतीही रेसिपी असो आज झटपट आपणास मिळून जाते. ज्यात आपणास एखाद्या पदार्थाचे नवीन नावही नकळत सापडून जाते.
१ लाख सबस्क्राईबर झाले, तर सिल्व्हर प्ले बटण आणि १० लाख सबस्क्राईबर झाले, तर गोल्डन प्ले बटण यूट्यूबच्या माध्यमातून त्या व्लॉगरला मिळते. आपली ओळख यूट्यूबच्या माध्यमातून घराघरांत बनविण्यासाठी यूट्यूबर्स ही ओळख आज अनेक महिलांनी तयार केली आहे. केवळ प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही, तर सामान्य गृहिणींनीदेखील असामान्य अशी ओळख निर्माण केलेली दिसून येते.
आपल्या भाषाशैलीने आकर्षित करणारी यूट्यूबर जेव्हा घराघरात पाेहोचते, तेव्हा तिचा दुसरा व्लॉग कधी येतो, याची आतुरतेने वाट पाहिली जाते.
कोरोना काळात अभिनेत्रींचेही व्लॉग सुरू झाले. सामान्य गृहिणींची गोष्टच विरळ. पण अभिनेत्रींपेक्षाही या गृहिणींचीही वाट पाहणाऱ्या व्ह्युवर्स पाहिल्या, तर यांचा ठसा साेशल मीडियाच्या माध्यमातून आज उमटलेला दिसून येतो. गृहिणींचे पाककलेबरोबरच बनविले जाणारे व्लॉग पाहता, घरात घडणाऱ्या घडामोडी, रोजचे आराखडे, जीवनातील घटनांचा वेध, सुखाबरोबर शेअर केले जाणारे दु:ख, कधी हास्यविनोद, कधी सल्ले, कधी जीवनातील चढ-उतार शेअर करत या गृहिणींनी यूट्यूबच्या माध्यमातून आपली ओळख आज घराघरांत निर्माण केली आहे.
केवळ गृहिणी आणि ती यूट्यूबर कशी? एवढी फेमस कशी? असे अनेक प्रश्न या गृहिणींना पाहिल्यावर पडल्यावाचून राहणार नाहीत. पण न चुकता, न थकता ठरल्या वेळी व्लॉग घेऊन येणाऱ्या या गृहिणी पाहिल्या की, वाटून जाते, आपली ओळख घडविताना या कुठेही कमी पडलेल्या नाहीत, यासाठी परदेश गाठण्याचीच गरज नाहीये किंवा आपल्याला काही येत नाही, आपण कमी शिकलोय, अडाणी आहोत, असेही समजण्याची गरज नाहीये, कारण गृहिणी कधीच अडाणी नसते. संसार, कुटंुबाचा डोलारा सावरताना तिनेही पुढे येण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला, समाज माध्यमातून अनेक गृहिणी, मैित्रणींना ती रोज भेटली, तर तिचं मनही हलकं होतंच. शिवाय कमेंटमधून तिला नवनवीन गोष्टी तिच्या मैत्रिणींच्या माध्यमातून समजतात, नवनवीन सल्ले मिळतात.
या माध्यमातून केवळ अभिनेत्रीच नाहीत, तर तरुणी, विवाहित स्त्रीया, प्रौढ महिला, अगदी आजीसुद्धा खरवस कसा बनवावा, बिर्याणी कशी बनवावी, याचं प्रशिक्षण यूट्यूबच्या माध्यमातून देताना दिसून येते.
यूट्यूबर हाऊस क्वीन धनश्री, यूट्यूबर शुभांगी ताई, मधुरा रेसिपीज, अभिनेत्री स्मीता शेवाळे, अगदी मानसी नाईकसुद्धा व्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर येते आणि इवलीशी मायरा… ती तर कोरोना काळात व्लॉॅगच्या माध्यमातून इतकी प्रसिद्ध झाली की, तिला झी मराठीवर सीरिअलच्या माध्यमातून आज आपण सगळेच पाहतोय.
‘आम्ही यूट्यूबर’ ही ओळख घडविताना, प्रत्येक गृहिणीने स्वत:ला खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी काही वेळ स्वत:साठी राखून ठेवण्यातच खरं इप्सित आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.