मनोरंजन : सुनील सकपाळ
खाकी’ ते ‘दृष्यम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून लक्षात राहिलेला कमलेश सावंत हा मराठीतील एक कसदार अभिनेता ‘फास’ या नव्या चित्रपटाद्वारे सर्वांसमोर येत आहे. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाद्वारे कमलेश एका शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसह त्याच्याशी साधलेला संवाद.
‘फास’ हा चित्रपट कर्जबाजारी शेतकऱ्याची व्यथा आहे. मात्र सरकार वा यंत्रणेच्या (सिस्टीम)विरोधात कुठलेही भाष्य नाही. बँक किंवा सावकाराकडून कर्ज घेत तो एकवेळ लोन फेडू शकतो; परंतु नैसर्गिक आपत्तीपुढे शेतकरी हतबल ठरतो. सलग ४ वर्षे आपत्तीचा सामना करून तो खचतो आणि जीवनमुक्त होण्याचा निर्णय घेतो. जेणेकरून त्यानंतर मिळणारी सबसिडी तसेच कुटुंबियांना मिळणारी मदत यातून कुटुंब सावरू शकते म्हणून तो आत्महत्या करतो. पण देहातून मुक्त झाला, तरी त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही, असा चित्रपटाचा सार असल्याचे कमलेशने सांगितले.
शेतकऱ्याची ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. कारण पहिली १५ मिनिटे माझी संवाददृष्ये आहेत. त्यानंतर मी आत्महत्या करतो. मात्र पुढील संपूर्ण चित्रपटात दिसतो. ग्रॅव्हिटीच्या विरोधात काम करायचे होते. त्यात मला रक्तदाबाचा (ब्लडप्रेशर) त्रास आहे. सातत्याने ४५-५० सीन माझ्या मृतदेहाखाली करताहेत. त्या प्रत्येक सीनमध्ये मी दिसतो. लटकलेल्या अवस्थेत त्रास होऊ नये, म्हणून निर्मात्यांनी सर्व व्यवस्था केली होती. मात्र ग्रॅव्हिटीविरोधात काम आणि बीपीचा त्रास त्यामुळे शुटिंग करणे सोपे नव्हते. दोन दिवस १२-१२ तास लटकण्याचे काम केले. मात्र तिसऱ्या दिवशी बीपी दोनशेपार गेला. त्यानंतर निर्माता, दिग्दर्शकांनी डॉक्टरांना तातडीने बोलावून घेतले. त्यांनी मला काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे तीन दिवस माझे अन्य सीन शूट झाले. मात्र त्यानंतर शूटिंग पूर्ण केले. जवळपास ७ दिवस लटकत होतो. आणखी एक आव्हान म्हणजे माझा मित्र एका तलावात आत्महत्या करतो. मला चांगले पोहता येते. मात्र कृत्रिम तलावात पोहण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे ‘फास’मधील शेतकरी साकारतानाचे समाधान आहे, असे कमलेशने पुढे सांगितले.
निर्माती माहेश्वरी पाटील-चाकुरकर यांचा हा पहिलाच सिनेमा असला तरी सर्व कलाकारांची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली. अविनाश कोलते यांचा दिग्दर्शक म्हणून …हा पहिलाच प्रयत्न आहे. मात्र त्यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. विषयाची खोली ठाऊक असल्याने त्यांनी एक चांगला सिनेमा बनवला आहे, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल. मला सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये या अनुभवी सहकाऱ्यांची चांगली साथ लाभली. प्रत्येकाने आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विषय असला तरी एक वेगळी कथा असल्याने प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहावा, अशी माझी सिनेरसिकांना विनंती असल्याचे कमलेशने पुढे म्हटले.
कमलेशने बॉलिवुडद्वारे सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. ती पार्श्वभूमी सांगताना तो म्हणाला की, आमचा ‘अॅडिक्ट मुंबई’ नावाचा ग्रुप होता. माझा जन्म काळाचौकीचा. निर्माते संतोष काळेकर, दिग्दर्शक चंद्रकांत कणसे तिथे राहायला होते. लेखक आशीष पाथरे, सुशील देशमुख, सुशील इनामदार, अभिनेता सुशांत शेलार आदी त्या परिसरात राहणाऱ्यांचा हा ग्रुप होता. एकांकिका स्पर्धेत आम्ही भाग घ्यायचो. त्यावेळी दिग्दर्शक मुकुल अभ्यंकर हे ‘गुब्बारे’ नावाची हिंदी सिरिअल करत होते. सुशांत त्यांना असिस्ट करत होता. त्यात एका रेल्वे पोलिसाची भूमिका होती. त्याला केवळ दोन डायलॉग होते. माझ्या छोट्याशा भूमिकेवर दिग्दर्शक खुश दिसले. त्यानंतर ‘भविष्यात चित्रपट, मालिका केल्यास मला मोठा रोल द्या, असे मुकुल यांना सांग’, असे सुशांतने सांगितले. मला ते जमले नाही; परंतु माझ्याजवळ येत अभ्यंकर यांनी मोठा रोल देण्याचे आश्वासन दिले. पुढे ‘थ्रिलर अॅट टेन’ मालिकेमध्ये काम दिले. पुढे सोनीवर ‘अचानक ३७ साल बाद’ ही सस्पेन्स थ्रिलर मालिका आली. माझी ती पहिलीच हिंदी मालिका होती. मुकुल अभ्यंकर यांनीच ती दिग्दर्शित केली. इन्स्पेक्टर मी साकारला. या मालिकेचे लेखक श्रीधर राघवन यांनी ‘खाकी’ चित्रपटाची कथा लिहिली होती. त्यांना माझी भूमिका आवडली. राघवन यांनी राजकुमार संतोषी यांच्या ऑफिसमध्ये बोलावून तुम्हाला पाहून हेड काँस्टेबलचा रोल लिहिल्याचे सांगितले. अशा तऱ्हेने हिंदी सिनेसृष्टीत माझे पदार्पण झाले. हिंदी सिनेमात काम करण्याचे श्रेय माझा मित्र सुशांत शेलारला जाते. त्याने मला मालिकेतील छोट्या रोलसाठी बोलावले नसते, तर माझी चित्रपटसृष्टीत इतक्या लवकर एंट्री झाली नसती. इतक्या मोठ्या बॅनरखाली तसेच राजकुमार संतोषी यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकासह ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो.
‘खाकी’ या चित्रपटातील कॉन्स्टेबल कमलेशसह ‘मी शिवाजी राजे…’मधील एसीपी रेगे, ‘भूतनाथ’मधील पोलीस इन्स्पेक्टर कमलेश, ‘दृष्यम’मधील इन्स्पेक्टर लक्ष्मीकांत गायतोंडे आणि ‘सूर्यवंशी’मधील पोलीस अधिकारी अर्णब देशपांडे, अशा भूमिकांमुळे पोलीस किंवा पोलीस अधिकारी आणि कमलेश असे समीकरण बनले आहे. मात्र कुठलीही भूमिका ‘भूमिका’ असते. आपल्याला वाट्याला आलेला रोल अधिक चांगल्याप्रकारे वठविण्याचा माझा प्रयत्न आहे. भविष्यातही त्यालाच प्राधान्य राहील, असे कमलेश सावंतने सांगितले.