हेल्थ केअर : डॉ. लीना राजवाडे
वाचक हो, उत्तम आरोग्यासाठी आहार हा खांब मजबूत असायला हवा, हे आपण मागील लेखात पाहिले. आजच्या लेखात जाणून घेऊया, निद्रा म्हणजे झोप या दुसऱ्या खांबाविषयी.
‘लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य संपत्ती मिळे’
हे वाक्य सगळ्यांना परिचित आहे. पण कळलंही नाही आणि वळत तर त्याहूनही नाही, अशीच परिस्थिती आहे.
देह वृत्ती किंवा स्वास्थ्य हे सुखावह होणे हे आहार आणि झोप यांवर अवलंबून असते. एवढेच नव्हे तर त्यावर स्थौल्य कार्श्य ठरते, असे भारतीय वैद्यक शास्त्र सांगते.
आज अनेक नामवंत क्लिनिक्स झोप या घटकाचा विचार शास्त्र म्हणून संशोधन म्हणून का होईना करू लागली आहेत. ही गोष्ट देखील, उत्तम आरोग्य हा विषय वैद्यक शास्त्र कसे व्यापक पद्धतीने करू पाहते आहे, याच गोष्टीचे निदर्शक आहे. अजूनही खाणे-पिणे, झोपणे ही गोष्ट सामान्य माणसाला शास्त्रीय वाटत नाही. किंबहुना गृहीत धरली जाणारी एक नैसर्गिक क्रिया असे समजून नव्हे गृहीत धरून प्रगतीसाठी गतिमान प्रवास करतोय माणूस! खरंच प्रगतिशील व्हायचे असेल, तर सजग होऊन या नैसर्गिक गोष्टी शास्त्र म्हणून समजावून घेऊया किमान तसा प्रयत्न करूया.
आता पाहूयात झोप येते म्हणजे नेमकं काय?
यदा तु मनसि क्लान्ते कर्मात्मानः समन्वितः
विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिति मानवः (चरक संहिता)
रात्रिस्वभाव प्रभवा च निद्रा : कर्मेन्द्रिये ज्ञानेंद्रिये सकाळी उठल्यापासून दिवसभर सतत काम करतात. ते करून शरीर दिवसअखेर थकते आणि ती कृती योग्य आहे वा नाही असा विचार करणारे मन हे देखील थकते. त्या वेळी माणसाला झोप येते. शरीराची ऊर्जा सांभाळण्यासाठी अशी ही रात्री येणारी स्वाभाविक निद्रा होय.
वास्तविक हे सूत्र स्थौल्य कार्श्य या गोष्टी कशा दुरुस्त कराव्यात हे सांगताना आले आहे. म्हणजे आपल्याला जाड किंवा बारीक न राहता साधारण शरीरयष्टी ठेवायची असेल, तर योग्य झोप आवश्यक आहे.
दिवास्वाप (दिवसा झोपणे) किंवा वामकुक्षी याचाही निर्देश शास्त्रात आहे; परंतु तीदेखील जेवणानंतर शतपावली करून मग पंधरा ते वीस मिनिटेच घेणे अपेक्षित आहे. ग्रीष्म ऋतूत दिवसा झोपायला हरकत नाही, अन्यथा एरवी दिवसा झोपणे अयोग्यच आहे. अपवाद कोण, तर आजारी, जखमी, वृद्ध, मुळात बारीक असणारे, गायन अध्ययन करणारे, अधिक वजन ओझे उचलणारे, क्रोध शोक भयक्लान्त. कारण त्यांना शरीराची ताकद वाढायला ही विश्रांती उपयोगी ठरते.
आता पाहू, चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
l झोपायची वेळ नियमित ठेवावी.
l आपण काय खातो, पितो याकडे लक्ष असावे.
l झोपण्यापूर्वी विश्रांतीला अनुकूल वातावरण तयार ठेवण्याचा प्रयत्न करा.
l दिवसा झोपण्याची वेळ मर्यादित करण्याचा प्रयत्न करा.
l नियमित शारीरिक व्यायाम (चालणे इ.) करायला हवा.
l आपल्याला काळजी वाटणाऱ्या गोष्टीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा.
l चांगले, मनाला प्रिय वाटणारे विषय (संगीत ऐकणे वगैरे) यामुळे शांत झोप लागते.
l तळपायाला तेल किंवा तुपाने मसाज करावा.
l डोक्याला तेल लावावे. कानात कोमट तेल घालावे.(तीळ तेल किंवा खोबरेल तेल वापरावे)
डोके आणि कान या भागांत अनेक पोकळ्या आहेत, ज्यातून सतत काहीतरी वहन चालू असते. ते वहन चांगले राहण्यास मदत होते. विचारही शांत होऊन झोप शांत लागते.
झोपेशीच निगडित सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे “स्वप्नं”! याविषयी थोडे, “माणूस झोपी गेल्यानंतर काही काळापुरते मन मात्र प्रतिमा, कल्पना, जाणिवा अनुभवत असते, त्याला स्वप्नं म्हणतात.” आयुर्वेद संहितेमध्ये ७ प्रकारची स्वप्ने सांगितली आहेत. दृष्ट(पाहिलेल्या घटना), श्रुत(ऐकलेले), अनुभूत(अनुभवलेले), प्रार्थित(इच्छिलेले), कल्पित(काल्पनिक) ही ५ प्रकारची स्वप्ने कोणतेच फल देणारी नाहीत. भाविक (काही गोष्टी पुढे घडणार आहेत असा संकेत देणारी) आणि दोषज (रज, तम यामुळे दिसणारी) ही स्वप्ने शुभ किंवा अशुभ फल देणारी आहेत. याशिवाय दिवसा पडलेले (खूप मोठे किंवा छोटे), रात्रीच्या पहिल्या प्रहरात पडलेले स्वप्न अल्प फल देते. सारांश एवढाच की, स्वप्नं नि मन याचा संबंध असतो. आज आधुनिक शास्त्रही हे मानू लागले आहे. अजूनही याविषयी अधिक संशोधन चालू आहे.
आपण सगळ्यांनी यातून थोडक्यात बोध घेऊ. निद्रा उत्तम, तर आरोग्य उत्तम.
आजची गुरुकिल्ली
निद्रायत्तं सुखं दु:खं पुष्टिः कार्श्यं बलाबलम्
सर्वांना सुख लाभावे, जशी आरोग्य संपदा
([email protected])