डिवचणे बेतले जीवावर

क्राइम : अॅड. रिया करंजकर


सुरेश अतिशय साधा-सरळ मुलगा. कोणाच्या उठण्या-बसण्यात नसणारा. आपलं काम भलं व आपण भलं, अशा स्वभावाचा. शेजारी गावावरून काका-काकीकडे राहायला आलेली आरती त्याला आवडू लागली. तसं त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितलं. पण मुलीच्या घरातील मंडळी या लग्नाला तयार होत नव्हती, तेव्हा नकळत सुरेश दारूच्या आहारी गेला. आपला मुलगा बिघडतो की, काय या भीतीने
सुरेशच्या आई-वडिलांनी अक्षरश: आरतीच्या नातेवाइकांचे पाय पकडले. शेवटी सुरेश व आरती यांचे लग्न पार पडले. लग्नानंतर सुरेश आई-वडील, भाऊ, पत्नी व घरातील जबाबदारी सांभाळू लागला.


लहान वयात लग्न झाल्यामुळे आरतीमध्ये अल्लडपणा होता. कोणाशी कसं बोलावं याचं भान तिला नसायचं. येथे मितभाषी सुरेश, तर बोलण्यात तारतम्य नसलेली आरती असा दोघांचा संसार सुरू झाला आणि या संसारवेलीवर दोन लागोपाठ कन्यारत्न यांचा जन्म झाला. दोन लागोपाठ मुलींच्या जन्मामुळे संसाराची जबाबदारी वाढली होती. केईएम हॉस्पिटलमध्ये टेम्परवारी असलेली नोकरी, तुटपुंजा पगार, असा संसाराचा गाडा चालवताना सुरेशची ओढाताण होत होती. सतत पत्नीची होत असलेली कुरबूर, या सर्व गोष्टींमुळे त्याचं दारूचं व्यसन हळूहळू वाढत होतं. दारूचं व्यसन असूनही नोकरी व संसाराचा गाडा तो जमेल तसा पुढे नेत होता. एवढंच नाही, तर सुरेश उत्तम स्वयंपाकी होता. लग्नाच्या, हळदीच्या जेवणाच्या ऑर्डर तो घ्यायचा. लोकांच्या घरातील लहान-मोठ्या कार्यक्रमांच्या ऑर्डर तो घ्यायचा. तो सुट्टीत घरी असायचा, त्यात स्वतः घरातील स्वयंपाक करायचा. पण एवढं असूनही दारूचं व्यसन मात्र त्याचा पिच्छा सोडत नव्हतं. त्यामुळे सतत पती-पत्नीमध्ये भांडण वाढत चाललेली होती आणि एकीकडे दोन्ही मुली मोठ्या होत होत्या.


असेच एकदा दोघांमध्ये जोरात भांडण झाले आणि आरती आपल्या मुलींना घेऊन गावाकडील आपल्या आई-वडिलांकडे गेली. फोनवरून विनवणी करून येत नव्हती, तेव्हा सुरेशचे आई-वडील जाणकार मंडळींना घेऊन सुनेच्या गावी गेले व तेथे जाणकार लोकांनी मध्यस्थी करून सुरेशकडून बाँड लिहून घेतला व यापुढे तो चांगला वागेल व पत्नीला त्रास देणार नाही, या अटीवर सुनेला व नातींना मुंबईला घेऊन सुरेशचे आई-वडील आले. दोघांचा संसार सुरू झाला. पण पतीने बाँड लिहून दिला आहे तो आता काहीच करणार नाही. त्याला आता आपण काहीही बोललो तरी चालेल, अशी समजूत आरतीची झाली व काही काळ गप्प बसलेली आरती पतीला छोट्या-छोट्या गोष्टीवरून टोचू लागली. नको नको ते बोलू लागली व सुरेशला त्रास देऊ लागली व वरून बोलू लागली, “तू मला काहीच करू शकणार नाही, कारण तसं तू लिहून दिलेले आहेस” ते शब्द सुरेशच्या कानावर पडू लागले.


असेच एक दिवस सुरेशला सुट्टी होती, त्या दिवशी तो ठरल्याप्रमाणे स्वयंपाक करणार होता व पनीरची भाजी असा बेत होता. सुरेश दुकानात जाऊन पनीर घेऊन आला व आरतीला मावशीकडे जायचं होतं या एवढ्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले आणि पुन्हा आरतीचे “तू आता काही करू शकणार नाहीस, तू लिहून दिले आहेस”, असे त्याला डिवचणे सुरू झाले. त्या वेळी सुरेश दाढी करत होता व तिच्याशी बोलत होता, “मला सुट्टी आहे. मुलींना घेऊन जाऊ नको.” आरतीचं तोंड मात्र चालूच होतं. तू माझं काहीच करू शकणार नाहीस! आणि येथेच सुरेशचा पारा चढला. त्याचा पुरुषार्थ जागा झाला व तो आरतीवर धावून गेला. या झटापटीत सुरेशच्या हातातील ब्लेड आरतीच्या मानेला दोन ठिकाणी लागले व तिला रक्तस्त्राव होऊ लागला. सुरेश घाबरून घरातून पळून गेला. घरात असलेले सासू-सासरे तिला केईएममध्ये घेऊन गेले व स्वतः सुरेशच्या वडिलांनी सुरेशविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.


पोलिसांनी नंतर सुरेशला घरातूनच ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर कलम ३०७ भा.दं.स. लावण्यात आले. पहिल्यांदा त्याला पोलीस कस्टडी, मग जेलमध्ये पाठवण्यात आले. यानंतर तो चार महिन्यांनी जामिनावर बाहेर आला. पण यात तो आपली नोकरी गमावून बसला. जोपर्यंत कोर्टाची कारवाई पूर्ण होत नाही, तोपर्यंत पत्नी व मुलांपासून दूर राहणार, अशी कोर्टाची ऑर्डर होती. आरती मुलींना घेऊन गावी आई-वडिलांकडे आहे. आरतीला बाँड पेपरवरून लिहून दिले. ‘तू काहीच करू शकणार नाही’, हे तिचं त्याला सतत डिवचणं जीवावर येऊन बेतलं.


जीव जाता-जाता वाचला. सुरेशची नोकरी गेली. आजी-आजोबांपासून व वडिलांपासून मुलं लांब गेली. तिच्या डिवचत राहण्यामुळे सुरेश गुन्हेगार बनून गेला. संसार अर्ध्यावर विस्कळीत झाला, िडवचणं जीवावर बेतलं आणि कलम ३०७ भा.दं.स. होऊन बसलं.
(हा लेख सत्य घटनेवर आधारित असून नावं बदललेली आहेत.)

Comments
Add Comment

येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत

नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले