Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअशा लाल मातीत जन्मास यावे...

अशा लाल मातीत जन्मास यावे…

संस्कृतीबंध : अनुराधा परब

खडबडीतपणा, सच्छिद्रता, रंग अशी वैशिष्ट्यं असणारा जांभा अतिपावसाच्या कोकणामध्ये घरबांधणीसाठी वापरला जाणं हे स्वाभाविक होतं. दिसायला देखणी, बांधणीदृष्ट्या मजबूत अशी चिरेबंदी लालचुटूक रंगातली कोकणातील घरे ही कोणत्याही ऋतूमध्ये तितकीच आकर्षून घेणारी. पश्चिम घाटातला हा जांभा दिसायला आकर्षक वाटला तरीदेखील पावसाच्या वेगवान माऱ्याने त्याची झीज तेवढ्याच वेगाने होत असते. याचा परिणाम लाल मातीच्या तयार होण्यावर होतो. पावसामध्ये ही माती अतिचिकट आणि वजनाला जड होते. या अतिचिकट मातीचे वजन पाण्यामुळे खूप वाढते आणि त्याचा दाब तयार होतो. या दाबाने कडे किंवा दरडी कोसळण्याच्या घटना कोकणात होतात.

यासंदर्भात इशारा देताना प्रसिद्ध भूगर्भतज्ज्ञ रेमंड दुराईस्वामी सांगतात, २००७च्या हवामानाच्या जागतिक अहवालानुसार, घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसात दरवर्षागणिक मोठी वाढ होणार आहे. ज्या वेळेस एका दिवसात २०० मिमी.पेक्षा अधिक पाऊस होतो, तेव्हा मातीचा दाब वाढून कडे-दरडी कोसळणाऱ्या घटनांची शक्यता वाढते. भविष्यात हे टाळण्यासाठी असा दाब वाढण्याची शक्यता असलेली सिंधुदुर्गातील ठिकाणे भूगर्भतज्ज्ञांच्या मदतीने वेळीच शोधून त्यावर उपाय केले, तर या जिल्ह्यातील संभाव्य मनुष्य व वित्तहानी टाळता येईल. दरडी कोसळण्यामागे जांभा खडकाच्या सच्छिद्रतेबरोबरच दिवसेंदिवस उघड्या-बोडक्या होणाऱ्या टेकड्या, डोंगर हेही एक कारण आहे. हा धोका टाळण्यासाठी डोंगरांवर स्थानिक वृक्ष, झाडे असणे, मातीला धरून ठेवणाऱ्या झाडांसोबतच गवत तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, सुपीक, चांगली पोषणमूल्यं असलेली ही कोकणातील माती समुद्रामध्ये वाहून जाणे असेच चालत राहणार.

प्रत्येक ठिकाणची माती आणि तिथली माणसं यांचं एक अनोखं नातं असतं. त्या त्या ठिकाणच्या निसर्गाचा माणसाच्या घडणीवर अदृश्य परिणाम होत असतो. असा परिणाम सिंधुदुर्गातही खासच पाहायला मिळतो. इथल्या माती चिऱ्याचा त्याने आपल्या ऊबदार निवाऱ्यासाठी वापर खुबीने करताना या मातीचे पीक पाण्यासाठीचे आडाखेही सहसा चुकलेले नाहीत. इथल्या पाण्यामध्ये असलेले फ्लोराइड आणि बोरॉन घटक पिकांसाठी तसे वाईटच. ते इलेक्ट्रो-निगेटिव्ह असल्यामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये एक तृतीयांशने घट होते. सिंधुदुर्गातल्या माणसाला खूप आधीच मातीची जातकुळी कळलेली असावी. जे काही इथे पिकवायचे आहे, त्यासाठी आपली अपार मेहनत आणि चिकाटीच कामी येणार आहे, याचीही पर्यायाने जाणीव झाली असावी. म्हणूनच तो मेहनतीत कमी पडत नाही आणि हारही मानत नाही. एका बाजूला मराठवाडा, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, दुसरीकडे तौक्तेसारखं चक्रीवादळ असो किंवा पूर परिस्थिती असो, इथला माणूस कधीही मोडून पडलेला आपल्याला दिसत नाही. हा कणखरपणा, संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहण्याची वृत्ती इथल्या माणसांमध्ये दिसून येते. वेडीवाकडी कशी का असेना आपली स्वतःची खास मतं असलेला, गजालीत कुणालाही मात देणारा असा कोकणी माणूस. इथल्या स्त्रियांमध्येही कणखरपणा, खंबीर वृत्ती दारातल्या कण्याप्रमाणे लक्षणीय.

मातीचे गुणधर्म हे तिथल्या पिका, फळा-फुलांमध्ये उतरतात, हा निसर्गनियमच आहे. म्हणूनच आपल्याला एरव्ही लाल दिसणारी जास्वंद तळकोकणात प्रवेश केल्यापासून पुढे अंमळ अधिकच लालगडद झालेली दिसते. फुलांमध्ये रंगातून ही माती नजरेला सुखावते, तर फळांमध्ये अवीट अशा गोडव्यातून. आता कोकण म्हटलं की, फळांचा राजा हापूस आंबा आठवणारच. तसं पाहायला गेलं, तर कोकणामध्ये हापूससोबतच केशर, पायरी, रायवळ अशा विविध जाती-चवींचे आंबे उन्हाळी मेवा म्हणून चाखले जातात. त्यातही देवगडच्या हापूस आंब्याची चव तर एकमेवाद्वितीय. त्यामुळेच भारतासह संपूर्ण जगात या आंब्याचे चाहते विखुरलेले आहेत.

देवगडच्या हापूस आंब्याची चव अन्य कोणत्याही हापूसला नाही. आजवर देवगडच्या हापूसची कलमे इतरत्र नेऊन त्यांची लागवड करण्याचे प्रयत्न अनेक झाले. देवगड हापूसच्या कलमांची कच्छमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. या लागवड केलेल्या आंब्याचे उत्पादन भरपूर होत असले तरीही त्याला देवगड हापूसची चव आलेली नाही. असे का व्हावे, याचे गुपित उलगडण्यासाठी भूगर्भतज्ज्ञ डॉ. दुराईस्वामी साह्य करतात. हवामानासोबतच त्या चवीचे एक कारण देवगडच्या भौगोलिक स्थानामध्ये आहे, असे ते सांगतात. देवगडमध्ये हापूस आंब्याला लाभलेली जांभ्याची लाल माती ही खनिजसंपन्न, तर आहेच शिवाय समुद्रावरून येणारे क्षारयुक्त खारे वारे या चवीला कारणीभूत आहेत. कच्छमध्ये खारे वारे आहेत; परंतु जांभ्याची खनिजयुक्त लाल माती नाही. कदाचित अनुकूल हवामान आणि भौगोलिकता यांचा असा मेळ असेल अशाच ठिकाणी ती जगप्रसिद्ध एकमेवाद्वितीय चव मिळू शकते. लाल माती, हवामान आणि त्यांचं चवीशी असलेले वैज्ञानिक नातं जेव्हा आपण समजून घेतो. त्या वेळी सिंधुदुर्गातले प्रसिद्ध कवी वसंत सावंत यांच्या अशा लाल मातीत जन्मास यावे, ही कविता आठवत राहते. यालाच जोड म्हणून ‘जशी माती तशी उपज’ हेच अधोरेखित करणाऱ्या कवी मुक्तेश्वरांच्या ओळी पटतात…

‘जिचे उदरी तव उत्पत्ती। तिची निवडली ऐशी जाती।
म्हणोनि खाण तशी माती। आहाणा लोकीं प्रसिद्ध।।’

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार, प्राचीन भारतीय संस्कृती अभ्यासक आहेत.)
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -