Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे निधन

ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे निधन

पुणे : संगीत रंगभूमीवर ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ७०व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

परिचय आणि कारकीर्द

कीर्ती शिलेदार यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी पुण्यात झाला. वडील जयराम आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक व नट असल्यामुळे संगीत व अभिनय यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेची पदवी घेतली होती. वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. संगीत स्वरसम्राज्ञी, संत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, स्वयंवर, मंदोदरी, संगीत सुभद्र, संशय कल्लोळ अशा अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.

पाच दशकांहून अधिक वर्षे रंगभूमीची सेवा

कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास मैफली झाल्या. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पाच दशकांहून अधिक वर्षे अविरतपणे केली.

आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण भूमिका

रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत.

काम केलेली नाटके आणि भूमिका

अभोगी (गगनगंधा), एकच प्याला (सिंधू), कान्होपात्रा (कान्होपात्रा), द्रौपदी (द्रौपदी), भेटता प्रिया (महाश्वेता), मंदोदरी (मंदोदरी), मानापमान (भामिनी), मृच्छकटिक (वसंतसेना), ययाति आणि देवयानी (शर्मिष्ठा), रंगात रंगला श्रीरंग (माधवी), रामराज्यवियोग (मंथरा), रूपमती (रूपमती), विद्याहरण (देवयानी), शाकुंतल (शकुंतला), शारदा (शारदा), श्रीरंग प्रेमभंग (राधा), संशयकल्लोळ (रेवती), सौभद्र (कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा), स्वयंवर (रुक्मिणी), स्वरसम्राज्ञी (मैनाराणी) पुरस्कार

ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि नाटकाचे नाव

अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी), एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर), एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी), कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी), दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला), नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर), नाही मी बोलत (संगीत एकच प्याला), नृपकन्या तव जाया (संगीत स्वयंवर), पांडवा सम्राट पदाला (संगीत द्रौपदी), पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र), पाही सदा मी (संगीत मानापमान), बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी), भक्ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग), मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर), येतील कधी यदुवीर, रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी), लाजविले वैर्यांना (संगीत द्रौपदी), सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग), हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)

पुरस्कार

महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६), महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार (२०१४)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -