
नवी दिल्ली (हिं.स.) : ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रंगणाऱ्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी जाहीर केले. आयसीसी प्रत्येक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत सर्वात उत्कंठावर्धक मानली जाते. यंदाही उभय संघ आमनेसामने असून २३ ऑक्टोबरला ते एकमेकांशी भिडतील.
१६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तानने मुख्य फेरीत (सुपर १२) थेट प्रवेश मिळवला आहे. श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या चार संघांना पहिल्या फेरीचा अडथळा पार करावा लागेल. पहिली फेरी १६ ऑक्टोबरपासून खेळली जाईल. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळेल. उपांत्य फेरी ९ आणि १० नोव्हेंबरला होणार आहेत. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.
सहभागी १२ संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप १मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर तसे ग्रुप २मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर या संघांचा समावेश आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील गटवार साखळी सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जातील. वर्ल्डकप सामन्यांसाठीची तिकीटविक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
भारताला पुन्हा ‘मौका’
आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेचा हा आठवा हंगाम असेल. २००७ मध्ये पहिल्या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने वर्ल्डकप उंचावला. यंदा सलामीला भारताची गाठ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका तसेच बांगलादेशसह पात्रता फेरीतून अव्वल १२ संघांमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन संघांशी दोन हात करावे लागतील. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताने कायम वर्चस्व राखले. मात्र, युएईत गेल्या वर्षी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने भारताला हरवत पराभवांची मालिका खंडित केली. वर्षभरात पुन्हा होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या माध्यमातून भारताला पुन्हा ‘मौका’ साधण्याची वेळ आली आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड असतील. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताला खूप अपेक्षा आहेत.
सुपर १२ संघ
अ गट
इंग्लंड
न्यूझीलंड
ऑस्ट्रेलिया
अफगाणिस्तान
अ गटातील विजेता
ब गटातील उपविजेता
ब गट
भारत
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिका
बांग्लादेश
ब गटातील विजेता
अ गटातील उपविजेता
पहिली फेरी
अ गट
श्रीलंका
नामिबिया
पात्रता फेरीतील दोन संघ
ब गट
वेस्ट इंडिज
स्कॉटलंड
दोन पात्रता फेरीतील संघ
भारताच्या लढती
२३ ऑक्टोबर - वि. पाकिस्तान (मेलबर्न)
२७ ऑक्टोबर - वि. अ गटातील उपविजेता संघ (सिडनी)
३० ऑक्टोबर - वि. दक्षिणआफ्रिका (पर्थ)
२ नोव्हेंबर - वि. बांग्लादेश (अॅडलेड)
६ नोव्हेंबर - वि. ब गटातील विजेता संघ (मेलबर्न)