
सोलापूर : ग्लोबल टीचर अॅवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी गंभीर आरोप केले आहेत. यामुळे व्यथित झालेले डिसले गुरुजी सरकारी शिक्षकाची नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.
ग्लोबल टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला. पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे, असे स्वत: डिसले गुरुजींनी सांगितले. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आले होते. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळेच डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचे दिसत आहे.
डिसले गुरूजी म्हणाले, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क साधला, याचा राग त्यांनी मनात धरला होता. राज्यपालांशी थेट संपर्क झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी थेट 'तुझा वारे गुरूजी करू' असा निरोप दिला होता. त्यामुळे अशा वातावरणात या व्यवस्थेत राहणे शक्य नाही. झोपही शांत लागत नाही. घरी सगळ्यांशी चर्चा केली. त्यामुळे या व्यवस्थेतून बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित असून वारे सर होण्याअगोदर बाहेर पडणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटले आहे.
रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले गेले आणि इतरही गंभीर आरोप केले आहेत.