मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात महिलांच्या कपड्यांमध्ये लपवलेले सुमारे चार किलो इफेड्रिन जप्त करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शुक्रवारी रात्री ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एनसीबीच्या अधिका-यांना या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अंधेरीतील एका कुरियर कंपनीच्या कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी महिलांसाठीच्या कपड्यांच्या खोक्यात हा साठा लपवून ठेवल्याचे दिसून आले. हा साठा पुण्याहून मागवण्यात आला होता. तसेच तो पुढे ऑस्ट्रेलियाला सागरी मार्गाने पाठवला जाणार होता, असे तपासात समोर आले.