नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लीजंड्स लीग टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत इंडिया महाराजास संघाने आशिया लायन्स संघावर ६ विकेट राखून मात करताना विजयी सलामी दिली. अष्टपैलू युसुफ पठाणची ४० चेंडूंतील ८० धावांची खेळी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
ओमानमध्ये सुरू असलेल्या लीजंड्स लीगमध्ये गुरुवारी आशिया लायन्सचे १७६ धावांचे आव्हान इंडिया महाराजास संघाने ४ विकेटच्या बदल्यात १९.१ षटकांत पार केले. त्यांच्या विजयात युसूफ पठाण चमकला. त्याने ४० चेंडूत ८० धावांची स्फोटक खेळी करताना ५ षटकार आणि ९ चौकार लगावले. युसुफशिवाय कर्णधार मोहम्मद कैफनेही ४२ धावा करताना विजयात खारीचा वाटा उचलला.
प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया महाराजासची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या सहा धावा असताना स्टुअर्ट बिन्नी (१० धावा) परतला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सुब्रमण्याम बद्रिनाथ (०) आणि नमन ओझा (२०) हेही लवकर बाद झाले. ३ बाद ३४ धावा अशा बिकट अवस्थेतून युसुफ पठाण आणि कर्णधार मोहम्मद कैफने संघाला सुस्थितीत आणले. या जोडीने वैयक्तिक खेळ उंचावतानाच चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली.
शतकाकडे कूच करणारा युसुफ १७व्या षटकात धावबाद झाला. तोवर त्याच्या खात्यात ४० चेंडूंत ८० धावा जमा झाल्या होत्या. शिवाय इंडिया महाराजासचा विजयही दृष्टिक्षेपात होता. युसुफचा भाऊ इरफान पठाणने १० चेंडूंत २१ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, उपुल थरंगा (६६ धावा) आणि कर्णधार मिसबा-उल-हकच्या (४४ धावा) दमदार खेळीच्या जोरावर आशिया लायन्सने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा उभारल्या. इंडिया महाराजासकडून वेगवान गोलंदाज मनप्रीत गोनीने ३ आणि इरफान पठाणने २ विकेट घेतले.
इंडिया महाराजासचा पुढील सामना शनिवारी (२२ जानेवारी) वर्ल्ड जायंट्सविरुद्ध रंगणार आहे.