मुंबई : मराठी पत्रकारितेत पाच दशकांहून अधिक काळ योगदान दिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला होता, मात्र फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र औषधोपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान गुरुवारी रात्री त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यातच त्यांचे निधन झाले.
कारकीर्द आणि पुरस्कार
इंडियन एक्स्प्रेस समूहात प्रदीर्घ काळ पत्रकारिता केलेले रायकर हे सध्या लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीचे चीफ रिपोर्टर, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक, दैनिक लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक अशा विविध वृत्तपत्रात वेगवेगळ्या पदांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांना पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.