Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीवसई - विरार मनपा क्षेत्रातील शाळा २७ जानेवारीपासून होणार सुरू

वसई – विरार मनपा क्षेत्रातील शाळा २७ जानेवारीपासून होणार सुरू

प्रथम ८ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग भरणार

१ ली ते ७ वी पर्यंतच्या वर्गांचा निर्णय नंतर

पालघर (प्रतिनिधी) : वसई – विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत २० जाने. २०२२ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पालघर व वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. त्यावेळी वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीच्या शाळा २७ जाने.२०२२ पासून सुरु करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंतच्या शाळा ह्या कोविड-१९ च्या परिस्थितीनुरूप नंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर, यांचे कार्यालयातून निर्गमित करण्यात आला आहे.

वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषद अंतर्गतच्या १२० शाळा, वरिष्ठ महाविद्यालय ०४, कनिष्ठ महाविद्यालय ३६, दिव्यांग शाळा ०७, खाजगी शाळा ७५२ कार्यरत आहेत.

वसई – विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण शालेय विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ९४ हजार २८९ इतकी असून त्यापैकी इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मध्ये २ लाख ६४ हजार ३५२ इतके विद्यार्थी व इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी मध्ये १ लाख २९ हजार ९३७ इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शासन निर्देशानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या पहिल्या डोसचे लसीकरण सुरु आहे.मनपा कार्यक्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या एकूण ७६ हजार ८२६ इतकी आहे. त्यापैकी ५८ हजार ७५८ लाभार्थ्यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झाले असून त्याची टक्केवारी ७६.०६ टक्के इतकी आहे.

शाळा सुरु करण्याबाबतच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियमावलीच्या अंमलबजावणी नुसार शाळा, महाविद्यालयांमध्ये तपासणी करीता पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. सदर पथकांमध्ये शिक्षण विभाग,मनपा वैद्यकीय आरोग्य विभाग, सहाय्यक आयुक्त स्तरावरील कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. शाळा तसेच महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची आवश्यकतेनुसार आरटीपीसीआर व अँटिजेन चाचण्याही करण्यात येणार आहेत.तसेच ज्या विद्यार्थ्यांचे /विद्यार्थिनींचे लसीकरण राहिले असेल त्यांच्यासाठी शाळा स्तरावर लसीकरणाची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे.

वसई – विरार शहर महानगरपालिका स्तरावर ‘कोव्हॅक्सीन’ लसीचे २१ हजार ७५० डोस तर ‘कोव्हीशिल्ड’ लसीचे ७६ हजार २० डोस शिल्लक आहेत. तरी २७ जाने. पासून इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याची दक्षता सर्व संस्थाचालक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शालेय शिक्षण विभागाचे शाळा सुरु करण्याबाबतच्या २० जानेवारीच्या परिपत्रकासोबत दिलेल्या परिशिष्टातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची राहील,असे कळवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -