- सुवर्णा दुसाने
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेला एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस. या पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले. देशातला सगळ्यात जुना आणि मोठा राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसकडे बघितले जाते. स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात काँग्रेस पक्षाने आपली छाप उमटविलेली आहे.
भारताची राजसत्ता पन्नासहून अधिक वर्षे एकट्या काँग्रेसच्या हाती होती. त्यामुळेच दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजेच संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वत्र काँग्रेसचीच सत्ता अनेक वर्षे राहिली. फक्त राजकीय सत्ता नव्हे, तर सहकार, शिक्षण क्षेत्रातही काँग्रेस पक्षाचा वरचष्मा पाहायला मिळतो. तळागाळात काँग्रेस पोहोचला असून गावागावांत काँग्रेसचे कार्यकर्ते आजही आढळतात.
कित्येक स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसचा जणू बालेकिल्ला होता. आजही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या हाती आहेत. मुंबई महापालिकेत अनेक वर्षे काँग्रेसने सत्ता गाजविली. पण १९९६ पासून मुंबई महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटली. गेल्या २५ वर्षांत पुन्हा मुंबई महापालिकेत काँग्रेसला आपली सत्ता आणता आली नाही. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका. एका राज्याच्या अर्थसंकल्पाएवढी म्हणजे सुमारे ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली महापालिका काँग्रेसच्या हातून सुटली.
१९९६ साली काँग्रेस पक्षातील एक मोठा गट फुटून शिवसेनेसोबत गेला. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मुंबई महापालिकेच्या १९९२च्या निवडणुकीत काँग्रेसला ११२ जागा जिंकता आल्या. ११९७ पर्यंत मुंबई महापालिकेवर काँग्रेसची सत्ता राहिली. त्यानंतर १९९७च्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या ४८ जागा मिळाल्या आणि शिवसेनेने मुंबई महापालिका काँग्रेसकडून हिसकावून घेतली. ती आजमितीस शिवसेनेच्याच ताब्यात आहे. शिवसेनेने मराठीचा विषय भावनिक करत मुंबईकरांवर पकड घेतली आणि मुंबई महापालिका काबीज केली.
१९९५ साली राज्यात व देशात सत्ता परिवर्तन झाले. राज्यात शिवसेना-भाजपची, तर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आली. देशात आणि राज्यात आलेल्या सत्तांतराप्रमाणे मुंबईत सत्ताबदल झाला. पुढे १९९९ साली देशात आणि राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. मात्र २००२च्या निवडणुकीत मुंबई मनपात काँग्रेसची सत्ता येऊ शकली नाही. १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबई मनपाच्या २००२च्या निवडणुकीत काँग्रेसला ६१, तर राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या. पण शिवसेना सर्वाधिक जागा जिंकत मुंबईच्या सत्तेच्या चाव्या राखण्यात यशस्वी ठरली. २००७च्या निवडणुकीत ७५, तर २०१२च्या निवडणुकीत ७६ वर काँग्रेसची गाडी अडून राहिली. देशात आणि राज्यात काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीची सत्ता येऊनही मुंबई मनपात मात्र काँग्रेस पुन्हा येऊ शकली नाही.
सन २०१२च्या सुमारास देशात काँग्रेस विरोधी वातावरण तयार झाले. काँग्रेस पक्षावर घोटाळ्यांचे अनेक आरोप झाले. देशभरात काँग्रेसविरोधी वातावरण तापत गेले आणि मोदी नावाची लाट आली. राज्यात आणि देशात भाजपप्रणीत सरकार आले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काही जण घोटाळ्यांच्या प्रकरणात गजाआड झाले, तर काही पक्षाला सोडचिट्ठी देत विरोधी पक्षात सामील झाले. एकंदरच काँग्रेस पक्षाला घरघर लागली. अशातच २०१७ साली मुंबई मनपाच्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या ३१ जागांवर समाधान मानायची वेळ आली. गेली अनेक वर्षे सर्वत्र सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष मुंबईच्या सत्तेपासून दूर चालला.
मुंबईत काँग्रेसची पीछेहाट होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे, काँग्रेसमध्ये लोकाश्रय असलेला नेता आजघडीस दिसत नाही. पक्षांतर्गत कुरघोडी करण्यात आणि एकमेकांचे पाय ओढण्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पक्षाचे नुकसान केलेले पाहायला मिळते. शिवाय काँग्रेसचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असतो आणि दिल्ली कोणत्याही नेत्याला एका ठरावीक उंचीपेक्षा मोठे होऊ देत नाही. त्यामुळे हायकमांडच्या इशाऱ्यानुसार मुंबईतील नेत्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात काँग्रेसला साथ देणारा मतदार वर्ग इतर पक्षांकडे वळताना दिसतो. काँग्रेसला सदैव साथ देणाऱ्या मुस्लीम समाजाला एमआयएम हा नवा पर्याय मिळाला आहे. उजव्या विचारसरणीला विरोध असलेल्या मतदारांना समाजवादी पार्टी, वंचित बहुजन विकास आघाडी असे पर्याय दिसू लागले.
उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा असलेले कृपाशंकर सिंह हे दिग्गज काँग्रेस नेते काँग्रेसचा हात सोडून त्यांनी कमळाची साथ सोबत घेतली आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात काँग्रेसपासून दूर गेला. मराठी मतदार मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसेच्या पाठीशी राहिला. एकंदरच काँग्रेसचा जनाधार दिवसेंदिवस कमी होत चालला. पक्षासाठी पोटतिडकीने काम करणारा नेता आजघडीस काँग्रेसमध्ये दिसत नाही. भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. कामगार नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मात्र अंतर्गत कुरघोडी आणि महाविकास आघाडीच्या समीकरणात काँग्रेस पक्षाला ते नवसंजीवन देऊ शकतील का, याबाबत शंकाच आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतरसुद्धा वर्षभरात ठळकपणे उठून दिसेल, अशी कामगिरी त्यांनी केलेली दिसत नाही.
नासा ग्लोबल मीडिया आणि श्री रिसर्च प्रा. लिमिटेड या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या मुंबईच्या राजकीय सर्व्हेत काँग्रेस पक्षाला आगामी मनपा निवडणुकीत अवघ्या २८ जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे. मुंबईतील २२७ वॉर्ड्समध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या सर्व्हेतून ही बाब पुढे आली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, तर मुंबई अध्यक्ष भाई जगताप आहेत.
काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे मुंबई मनपात केवळ २८ नगरसेवक असणे म्हणजे एक प्रकारे काँग्रेसचा जनाधार कमी होत चालल्याचे द्योतक मानावे लागेल. कारण मुंबईचे मतदार हे सर्व जाती धर्माचे आणि सर्व स्तरातले असतात. धर्मनिरपेक्ष राजकारण ही काँग्रेसची धारणा आहे. त्यामुळे मुंबईत जर काँग्रेस पक्षाची अशी वाताहत होत असेल, तर जनसामान्यांपासून काँग्रेसची नाळ तुटत चालली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
(लेखिका, नासा ग्लोबल मीडियाच्या संस्थापक आहेत.)