सोनू शिंदे
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असताना कॅम्प नं-४ सुभाष टेकडी येथील शासकीय बालसुधारगृहातील काही मुलांना ताप, खोकला, सर्दी यांचे लक्षणे आढळून आली. महापालिका आरोग्य पथकाने ३३ मुलांची कोरोना चाचणी केली असता, ३३ पैकी १६ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी उघड झाले.
या मुलांवर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली. दरम्यान मुलांच्या तब्येती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी पगारे म्हणाले.
संसर्ग झालेल्या मुलांना कॅम्प नं-५ येथील महापालिका कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. तर इतर मुलांना बालगृहात ठेवणार असून त्यांच्यावर डॉक्टरांचा वॉच राहणार आहे. कोरोनाग्रस्त झालेल्या मुलांची तब्येत धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार करून लवकरच सोडून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली.