मुंबई : मुंबईत कोरोना लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई गुन्हे शाखेने गोरेगाव परिसरात केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही टोळी लस न घेतलेल्यांना लसीचे दोन्ही डोस झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देत होती आणि त्या बदल्यात १,५०० रुपये घेतले जात होते.
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. यात गुन्हे शाखेसह मुंबई महापालिकेच्या पथकाने संयुक्तरित्या गोरेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्हे शाखेने लसीची अनेक बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही टोळी ज्यांनी कोविड-१९ लसीचा डोस घेतलेला नाही अशा लोकांना कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्रे देत होती. आतापर्यंत या लोकांनी सुमारे ७५ जणांना कोरोना लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे विकली आहेत. बनावट प्रमाणपत्राच्या बदल्यात ही टोळी लोकांकडून १,५०० रुपये घ्यायची. हा धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. या कारवाईनंतर या दोन आरोपींशिवाय या टोळीत आणखी कोणी सहभागी आहेत का आणि या टोळीने आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, याचा शोध सुरू आहे.