मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात चांदीवाल आयोगाकडून सुरु असलेल्या चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. जेव्हा आम्ही मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या तपासाविषयी विचारणा केली तेव्हा ते थरथर कापत होते, असे अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाला सांगितले.
मी स्वत: आणि तीन अतिरिक्त मुख्य सचिवांनी परमबीर सिंह यांच्याकडून अँटिलिया प्रकरणाचा तपशील मागितला. त्यावेळी परमबीर सिंह अक्षरश: थरथर कापत होते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याच्या प्रकाराविषयी मला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सचिन वाझे तुमच्या मर्जीतील अधिकारी असताना तुम्हाला या घटनेविषयी काहीच पत्ता कसा नाही, असेही आम्ही त्यांना विचारल्याचे देशमुख यांनी म्हटले. त्यानंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्याचा सल्ला दिला. मात्र, परमबीर सिंह यांनी त्याला विरोध करत हा तपास मुंबई पोलिसांकडेच राहू द्यावा, असे म्हटले. ६ मार्च २०२१ रोजी अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचदिवशी सचिन वाझेला गुप्तवार्ता विभागातून हटवण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाला दिली.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला बार मालकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची नेमणूक केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले होते. तसेच आयोगासमोर हजर होण्यासही नकार दिला होता.
या चौकशीदरम्यान सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनीही अनिल देशमुख यांना काही प्रश्न विचारले. गुप्तवार्ता विभागात काम करणारा सचिन वाझे त्याच्या वरिष्ठांना उत्तर देण्यास बांधील नव्हता. सचिन वाझेने त्याच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनाही कोणत्याही संवेदनशील प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देऊ नये, असे बजावले होते. सचिन वाझे ही सर्व माहिती परमबीर सिंह यांना देत होता. परमबीर सिंह ही माहिती मंत्रिमंडळातील सदस्यांना देत असत, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.