– डॉ. केशव साठये
रविवारी (१६ जानेवारी) सकाळी फेसबुक उघडले, तर एक बातमी तिथे येऊन थडकली होती. ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे निधन. वय केवळ ६५. बातमी धक्कादायक होती. दोन दिवसांपूर्वीच मेहता प्रकाशनचे तडफदार सुनील मेहता यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या शोकसभेचे आयोजन यांनीच केले होते. वाचल्यानंतर ताबडतोब माझी मैत्रीण डॉ. करुणा गोखले हिला फोन केला. ती म्हणाली, “अरे, आम्ही उद्या म्हणजे सोमवारी भेटणार होतो. काही तरी नवा प्रकल्प करण्याचे त्यांच्या डोक्यात होते.” जाखडे यांच्या अचानक झालेल्या निधनाने ती कमालीची व्यथित झाल्याचे जाणवत होते. सिमोन द बोव्हुआर हिचे ‘द सेकंड सेक्स’ हे करुणाने केलेले मराठी रूपांतर जाखडे यांच्या पद्मगंधानेच १०-१२ वर्षांपूर्वी प्रकाशित केले होते. स्त्रीविषयी अतिशय सखोल चिंतन करणारे जागतिक स्तरावरचे हे साहित्य मराठीत यायला हवे, हा विचार असणाऱ्या जाखडे यांच्यासारख्या एका प्रयोगशील प्रकाशकाचे असे तडकाफडकी जाणे चटका लावणारेच आहे.
१२ जानेवारीला एका लहानशा शस्त्रक्रियेचे निमित्त होऊन ५६ वर्षांच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या धडाडीच्या प्रकाशकाने शेवटचा श्वास घेतला आणि आता हे. ५६ काय किंवा ६५ काय या वयात मृत्यूने दार ठोठावणे पटणारे नाही. किंबहुना या वयात अशा सर्जनशील क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या माणसांना धुमारे फुटतात. नव्या कल्पनांना पंख देण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. हे दोघेही तसेच धडाडीचे आणि नवतेचे पुरस्कर्ते होते.
पद्मगंधाने मराठी साहित्य विश्वात अनेक मौल्यवान ग्रंथ आणले. आवर्जून उल्लेख करायला हवा तो संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ग्रंथांचा. लज्जागौरी, भारतीय रंगभूमीच्या शोधात, लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा ही डॉ. ढेरे यांनी संशोधन करून लिहिलेले हे साहित्य शब्दरत्नांच्या रूपात अभ्यासकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल जाखडे कायम स्मरणात राहतील. ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’मधील मराठी विषयी डॉ. गणेश देवी यांनी संपादित केलेला ग्रंथराज म्हणजे पद्मगंधा प्रकाशनाने आपल्या देशातील वैविध्यपूर्ण भाषांच्या चळवळीतला आपला वाटा उचलून केलेला कडकडीत सलामच आहे.
सुनील मेहता यांचा बाजच निराळा. मराठी विश्वाच्या सीमा ओलांडून त्यांनी पाश्चिमात्य आणि इतर भारतीय भाषांतील खजिना मराठीत आणला आणि वाचकांच्या ज्ञानकक्षा समृद्ध केल्या. जेफ्री आर्चरपासून झुम्पा लाहिरीपर्यंत आणि जॉन ग्रिशॅमपासून तस्लिमा नसरिनपर्यंतच्या भल्या भल्या लेखकांना मेहता यांनी मराठीच्या पंगतीत आणून बसवलं. अनुवाद हा साहित्य प्रकार तसा दुर्लक्षितच. पण या दोन्ही प्रकाशकांनी या घाटाचा उचित सन्मान केला. जाखडे यांनी अभिजात साहित्यावर भर दिला, तर मेहता यांनी मनोरंजन करणाऱ्या पुस्तकांना पसंती दिली. पण एक नक्की की, दोघांनी काढलेली पुस्तके उत्तम आणि आशयसंपन्न म्हणून नावाजली गेली.
अरुण जाखडे केवळ प्रकाशकच नव्हते, तर एक सर्जनशील लेखक आणि कार्यकर्ते होते. ग्रंथजत्रा, राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन असो जाखडे तिथे हजर असत आणि येताना रिकाम्या हाताने न येता तिथून काही नवा विचार आणि संकल्पना ते घेऊन येत आणि मग पद्मगंधा एका अभिनव ग्रंथाच्या निर्मितीत मश्गुल होत असे.
सुनील मेहता तर नव्या युगाशी जुळवून घेतलेले प्रकाशक म्हणून ओळखले जात. पण ते करताना जुन्या अभिजात साहित्यिकांच्या लक्षणीय साहित्यकृतींकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. वि. स. खांडेकर, व. पु. काळे, द. मा. मिरासदार, आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, रत्नाकर मतकरी अशा लेखकांच्या नव्या जुन्या साहित्याला आपल्या प्रकाशन संस्थेशी त्यांनी जोडून घेतले आणि नव्या-जुन्या लेखकांचा उत्तम मेळ साधत सर्वच थरातील वाचकांना आपलेसे करण्याचा त्यांचा प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मराठी प्रकाशकाला मानाचे पान मिळवून देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. फ्रँकफर्ट, नॉर्वे अशा ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठीची पताका फडकावण्याचे त्यांचे योगदान न विसरता येणारे आहे. ई-बुक्स हा प्रकार मराठी साहित्यविश्वात रुजवण्याचे श्रेयही त्यांनाच द्यायला हवे. पद्मगंधा दिवाळी अंक हा चोखंदळ वाचकांच्या पसंती क्रमात कायमच उच्च स्थान मिळवून राहिला. याचे श्रेय जाखडे यांच्यातील डोळस संपादकाला द्यायला हवे. मेहता मराठी ग्रंथ जगत ही प्रकाशन विश्वाची माहिती देणारे मासिकही पुस्तकांची जंत्री अशा स्वरूपात कधी समोर आले नाही. त्यातही अनेक चांगले लेख आणि आशययुक्त ऐवज देऊन साहित्यिक गृहपत्रिकेचे (हाऊस जर्नलचे) मोल मेहता यांनी अधोरेखित केले.
अरुण जाखडे यांनी आपली साहित्यिक समज आणि तळमळ ही कधीही आपल्या व्यावसायिक गणिताशी जोडली नाही. किंबहुना हे लोकांनी वाचलेच पाहिजे असे त्यांना वाटले, ते त्यांनी फायदा-तोटा याचा विचार न करता प्रकशित केले. र. धों.हा रघुनाथ कर्वे यांच्या प्रागतिक विचारांचा धांडोळा घेणारा ग्रंथ, द. भि. कुलकर्णी यांचे समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित करून पद्मगंधाने आपले साहित्यिक उत्तरदायित्व कायमच सिद्ध केले. सुनील मेहता काय किंवा अरुण जाखडे काय यांच्यासारखे प्रकाशक सतत नवं काही तरी शोधत.
सुनील मेहता, प्रकाशन व्यवसायाला सतत बदलत्या अभिरुचीशी जोडण्याचा प्रयत्न करत, तर जाखडे यांनी लोकसाहित्य, संशोधन, समीक्षा या विषयीचे अनेक ग्रंथ संपन्न करून मराठी वाचकांची अभिरुची जोपासली. कोरोनाच्या या सावटामध्ये प्रकाशन व्यवसायाला थोडी मरगळ आलेली असताना या नवोन्मेषशाली प्रकाशकांनी घेतलेली एक्झिट म्हणूनच वेदनादायक आणि साहित्यिक विश्वाला दीर्घकाळ रुखरुख लावणारी आहे.