संतोष वायंगणकर
कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक विषय बदलत गेले. सामान्यजनांनी काही गोष्टी समझोत्यानेच घेतल्या. कितीतरी विषय बाजूला पडले. जवळपास सर्वच कुटुंबातील आजार दोन वर्षांत कुठे होते? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. चर्चा होती ती फक्त कोरोनाचीच. त्यामुळे घरातील वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत त्यांना असलेल्या वर्षानुवर्षांच्या व्याधी विसरून गेले होते. अनेक व्याधीने, वेदनेने विव्हळणारे चेहरेही या मधल्या काळात डॉक्टरकडेही गेले नाहीत. कारण डॉक्टरही रुग्ण तपासात नव्हते. पाच फुटांवरूनच औषध, गोळ्या दिल्या जायच्या, यामुळे डॉक्टरकडे जाणाऱ्यांची संख्याही कमीच होती. कोरोना प्रादुर्भावामुळे काही डॉक्टरांनी घेतलेली ही काळजी होती; परंतु यात एक गोष्ट घडली, कोरोनाच्या विळख्याने अनेक विषय मागे पडले. शारीरिक दुखणं-खुपणं, त्याचा कोणत्याही कारणाने असेल, पण विसर पडला. तसेच रोजच्या जीवनातील काही समस्या-प्रश्नही मागे पडले. पाणीटंचाई हा देखील फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. पाणीटंचाईकडे कधीच दुर्लक्ष करून चालणारे नाही. यापूर्वी कोकणात फार मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या होती, ती आज संपली आहे, असे काहीही झालेले नाही. उलट मधल्या कालावधीत पाण्याचे उद्भवच कमी झाले. स्रोत थांबले यामुळे अनेक गावोगावच्या नळपाणी योजनांच्या पाइपलाइन कोरड्या झाल्या.
कोकणात पाणीटंचाईची समस्या गंभीर होती. यात १९९५च्या काळात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती सरकार आले. या सेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणे यांनी कोकणासाठी, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी दीड हजार कोटी दिले. यामुळे त्यावेळची पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली. कोकणातील अनेक गावांतून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. गावोगावी टँकरने पाणी दिलं जायचं. एक-दोन मैल पायपीट करून पाणी आणताना महिला दिसायच्या. हे विदारक चित्र काहीसं बदलले गेले. काही गावांतून ही समस्या फार गंभीर होती. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करणारी गावच्या गावं होती. त्याचदरम्यान गावोगावी ग्रामस्थ एकत्र येऊन कच्चे बंधारे बांधले जायला लागले. हे कच्चे बंधारे बांधण्यामुळे गावातील वाडी-वस्तीत ओहोळांवर, वाहत्या पाण्याला अडविण्यात आले. विहिरींच्या पाण्याचा साठा वाढायला यातून चांगलीच मदत झाली. पूर्वी यात शासनाचा सहभाग नव्हता. त्यामुळे गावच्या वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहभागातून बांधल्या गेलेल्या बंधाऱ्याचे पाणी अडविण्याचा एक वेगळा आनंद होता. शासनाकडून कच्चे बंधारे बांधण्याचे आरंभिले गेले, तेव्हापासून शासकीय कर्मचाऱ्यांचा पाणी साठवणुकीसाठी कच्चे बंधारे बांधण्यासाठी सहभाग असला, तरीही ती केवळ औपचारिकता असत. शासनाच्या फाइलला फोटो चिकटविण्यासाठीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची ती धडपड असते. मात्र, काहीही असले तरीही कोकणात जास्तीत-जास्त कच्चे बंधारे बांधले गेले पाहिजेत. तरच दरवर्षी भासणारी पाणीटंचाई कमी होईल.
शासनस्तरावर जरी कच्चे बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न होत असले तरीही ग्रामस्थांचा पुढाकार आणि सहभाग यात असायला हवा. जागतिक स्तरावरही ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणीसाठे कमी व्हायला लागले आहेत. पाणीटंचाईचे संकट केव्हाही येऊन उभे राहील. पाण्याचे संकट हे भयानक संकट असेल. जागतिक समस्येत आपला देशही असणार आहे. आपणाकडे कोकणात नद्या, ओहोळ, मोठे आहेत म्हणजे आपणाकडे पाणीटंचाई भासणार नाही, या भ्रमात आपण राहून चालणार नाही. पाणीटंचाई हा जागतिक स्तरावरचा फार मोठा प्रश्न आहे. याचे गांभीर्य जागतिक स्तरावरही चर्चिले जात आहे. कोणत्याही प्रश्नाची उकल करण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा.
कोकणापुरता विचार करताना आपणाकडे पाण्याचे पुरेसे साठे नाहीत. मध्यम व छोटे पाटबंधारे प्रकल्प नाहीत. जे आहेत ते अपूर्णावस्थेत आहेत. गेल्या काही वर्षांत कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांना निधीच देण्यात आलेला नसल्याने पाटबंधारे प्रकल्पांची कामे ‘जैसे थे’ आहेत. गेल्या काही वर्षांत कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी राज्य सरकारने निधीच दिलेला नाही. यामुळे या प्रकल्पांची कामे चालू होऊ शकली नाहीत. यातच पाटबंधारे प्रकल्प निधीतील घोटाळे देखील समोर आले. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे प्रकल्पांसाठी निधी नाहीच. निधी देणार म्हणून घोषणा झाल्या; परंतु प्रत्यक्षात कोकणासाठी निधीच उपलब्ध झालेला नाही. पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे. आज तरी याची गरज आणि महत्त्व कुणाला वाटत नसले तरीही, भविष्याचा विचार करता कोकणातील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजेत, ही काळाची गरज आहे. कोकणातील, आपण सारे जगावेगळे, असे समजतात. यातून आपण बाहेर यायला पाहिजे आणि पाणी प्रश्नाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, तरच पाणी समस्येला सामोरे जाता येईल.
[email protected]