मुंबई : मुंबईत तिसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकोसिसच्या चार रुग्णांची नोंद झाली आहे. केईएम रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र होते.
दुसरी लाट ओसरायला लागल्यानंतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्याही कमी होत असल्याचे दिसत होते. आता तिसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकोसिसच्या चार रुग्णांची नोंद झाल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एका रुग्णावर मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची ५ जानेवारीला करोनाचाचणी करण्यात आली. १२ जानेवारीला अशक्तपणाची तक्रार असल्यामुळे या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रक्तातील साखरेची पातळी ५३२वर गेली होती. डॉक्टरांनी डायबेटिक केटोअॅसिडोसिसवर उपचार सुरू केले आणि आवश्यक तपासण्या केल्या. त्यावेळी रुग्ण स्टिरॉइड्सवर नसल्याचे सांगण्यात आले.
डॉ. हनी सावला यांच्याकडे रुग्णाने तोंडामध्ये दुखत असल्याचे सांगितले. एमआरआयने क्रॉनिक सायनुसायटिस दाखवण्यात आले असले तरीही हाडांची झीज झाली नव्हती. परंतु, दुसऱ्या दिवशी चेहऱ्याच्या डाव्या बाजूला सूज व वेदना वाढल्यामुळे अधिक चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, अजून काही दिवस वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.