Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीकोविड सेंटरच्या कंत्राटात मुख्यमंत्र्यांनीच घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

कोविड सेंटरच्या कंत्राटात मुख्यमंत्र्यांनीच घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

पुणे : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई, पुणे, नवी मुंबईमध्ये कोविडचा घोटाळा करून कमाई केली. ते लोकांच्या जिवाशी खेळले आहेत. बनावट कंपन्यांना कंत्राटे दिली, असा घणाघाती आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अनेक कंपन्यांमध्ये पार्टनर उद्धव ठाकरे यांचा उजवा आणि डावा हात आहे. हा घोटाळा मुंबईत आणि पुण्यातही झाला आहे. जी कंपनीच अस्तित्वात नाही अशा कंपन्यांना कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या कंत्राटात त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले. मात्र अनेक लोकांना जीव गमवावा लागला.

पुणे जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याच्या विरोधात मी फौजदारी तक्रार दाखल करणार आहे. जी कंपनी अस्तित्वातच नव्हती त्या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले. आज मी सगळ्या फायली तपासल्यानंतर माझी शंका पक्की झाली आहे. मी येत्या काही दिवसांत राज्यपालांना भेटणार आहे. हे कोविड केंद्र ज्या पद्धतीने दिले गेले, बेनामी ओनरशिप कोणाची आहे, हे सगळे पुरावे राज्यपालांना देणार आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

आश्चर्य म्हणजे, पीएमआरडीए, मुंबई महापालिका, एमएमआरडीए, सिडकोला जी कागदपत्रे दिली ती तपासलीही नव्हती. ज्याला अनुभव नाही अशा माणसाला आठ कोविड सेंटर दिले गेले. पुणे आयुक्त आणि महापौरांशी बोलणे झाले आहे, पुण्याच्या महापौरांनी या कंपन्याच्या विरोधात फौजदारी तक्रार द्यावी,’ असे सोमय्या म्हणाले.

‘लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ ही कंपनी नोंदणीकृतच नाही. तीन ठिकाणी पार्टनरशिप म्हणून कागदपत्रे दिले. तिन्ही ठिकाणी कागदपत्रे वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावामुळे जमा केलेली कागदपत्रे तपासली गेली नाहीत. याविरोधात सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, मुंबई महापालिका आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे तक्रारी केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

कंपनी मालकाचे नाव पुढच्या आठवड्यात सांगणार

या बनावट कंपन्यांचे नाव शोधा, मी कंपनीच्या मालकाचे नाव पुढील आठवड्यात घोषित करणार आहे. मालक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवा हात आहेत. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडील फाइलमध्ये आहेत. पण ते पुढील आठवड्यात जाहीर करणार, असे सोमय्या यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -