मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय. गेल्या दहा दिवसांपासून मुंबईसह राज्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. रुग्णांची कमी होत जात असलेली संख्या आशादायी आहे. मात्र त्यामुळे हुरळून न जाता सावध राहण्याची गरज आहे. १० ते १५ जानेवारी या सहा दिवसांमध्ये दहा हजारांहून अधिक बाधित आढळल्याने मुंबईकरांचे धाबे दणाणले. त्यात १२ जानेवारीला सर्वाधिक १६,४२० रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर सलग तीन दिवस दहा हजारी आकडा पाहायला मिळाला, तरी काही हजारांचा फरक होता. त्यानंतरच्या तीन दिवसांत आठ हजारांच्या खाली रुग्ण आढळले. त्यात १७ जानेवारीला गेल्या पंधरवड्यातील सर्वात कमी म्हणजे ५९५६ रुग्णसंख्येची नोंद झाली. दुसऱ्या दिवशी ६१४९ बाधित आढळले, तरी दोन दिवसांमधील फरक हा केवळ १९३ इतकाच आहे.
तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र आहे. याबाबत तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची काय आहेत कारणे, हे जाणून घेतले पाहिजे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहता, त्यावरून महाराष्ट्र, विशेषतः मुंबईत १५ जानेवारीपर्यंत कोरोना उच्चांकी पातळीवर पोहोचला, असे वाटत होते; परंतु येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पूर्णपणे कमी होईल, असे दिसते. ‘मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होईल, असे राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साली यांचे म्हणणे आहे. बाधितांची संख्या कमी होण्याची कारणे विषद करताना, कोरोना रुग्ण कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, राज्य सरकारने तत्काळ अतिजोखीमयुक्त देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर निर्बंध लावले. तसेच गरज भासल्यास त्यांना विलगीकरणात (क्वारंटाइन) पाठवण्यात आले. राज्य सरकार मुंबईसह राज्यभरात लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबवत आहे. प्रत्येकाचे लसीकरण व्हावे, असे सरकारचे धोरण आहे, असे डॉ. भन्साळी यांचे म्हणणे आहे. मात्र लसीकरणाची मोहीम वेग पकडण्याचे सर्वाधिक क्रेडिट केंद्र सरकारला जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक राज्याला हवा तितका लसीचा साठा उपलब्ध करून दिला. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात लसीकरण झालेल्यांचा आकडा वाढत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बहुतांश नागरिकांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले. सद्यस्थितीत कोविड चाचण्यांचे प्रमाणही कमी झालेले आहे. या पूर्वी जवळपास दोन लाख नमुन्यांची तपासणी केली जात होती. आता हाच आकडा जवळपास दीड लाखांवर आला आहे. रुग्णांचा आकडा वाढत असल्याने महाराष्ट्राने कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केले आहे. मात्र देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या काही दिवसांमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत चाचण्यांमध्ये घट झाल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे़ चाचण्यांवर भर देऊन बाधितांवर वेळेत उपचाराद्वारे कोरोना प्रसार रोखा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिली आहे़ कोरोनाचा उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत़ ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने २७ डिसेंबर रोजी कोरोना नियंत्रणाबाबत सुधारित सूचना दिल्या होत्या़ त्यात कोरोना चाचण्या हा महत्त्वाचा घटक आहे़ मात्र अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचण्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे, असे खरमरीत पत्र पाठवून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी चाचण्या कमी केलेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने १० जून रोजी कोरोना चाचण्यांबाबत मार्गदर्शक सूचना प्रस्तुत केल्या होत्या़ कोरोनाची लागण झाल्याचे सुरुवातीच्या टप्प्यातच समजल्यानंतर रुग्णाचे तत्काळ विलगीकरण आणि उपचार करणे आवश्यक असते़ शिवाय, चाचण्यांमुळे प्रतिबंधित क्षेत्र निश्चितीकरणाबरोबरच रुग्णच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून संभाव्य कोरोनाप्रसार रोखण्यास मदत होते, याचाही आहुजा यांनी या पत्रात पुनरुच्चार केला आहे़ महाराष्ट्र सरकारला सुबुद्धी सुचल्यास कोरोना प्रतिबंधक चाचण्यांमध्ये वाढ करताना कोरोनाची लाट संपवण्यास मदत होईल.
कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यासह गेल्या पंधरवड्यात नव्या बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळजवळ दुप्पट आहे. मुंबईत मंगळवारी ६,१४९ नवे रुग्ण आढळले तसेच १२,८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात गेल्या काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या थोडी वर-खाली होत असली तरी संसर्ग वाढीचा वेग कमी झाला आहे. मंगळवारी नव्याने आढळलेल्या ६,१४९ रुग्णांपैकी ५७५ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. दैनंदिन रुग्णसंख्या घटल्यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्या ही कमी होऊन ४४ हजारांवर आली आहे.
बाधितांची संख्या शून्यावर येऊन जनजीवन सुरळीत राहावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तिसऱ्या लाटेनंतरही कोरोना आणि त्याचे नवे व्हेरिएंट डेल्टा आणि ओमायक्रॉनचे अनेकांना गांभीर्य नाही. ही चिंताजनक बाब आहे. आपल्याला कोरोना किंवा तत्सम विषाणूसोबत जगायचे असले तरी प्रत्येकाचा शेवट आहे. आपण कोरोनाला हरवू शकतो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. हा विश्वास सार्थ करून दाखवताना त्यांनी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे वर्षभरात लसीकरण मोहिमेने दीडशे कोटींचा आकडा पार केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करावे. त्यामुळे तिसरी लाट लवकरात लवकर ओसरेल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.