मुंबई : मुंबईत बुधवारी ६,०३२ नवीन रुग्णांची भर पडली. यापैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ५,०६७ असून, हे प्रमाण ८४ टक्के इतके आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असली, तरीही ऑक्सिजनची गरज भासलेल्या रुग्णांच्या संख्येत मात्र थोडी वाढ दिसून येत आहे.
ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या १०३ इतकी आहे. रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १७ टक्क्यांवरून १३ टक्के इतके खाली आले आहे. मुंबईमध्ये बुधवारी ५३८ रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी किती जणांना ऑक्सिजनची गरज लागते व आयसीयूमध्ये किती रुग्णांना दाखल करावे लागते याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.
२ जानेवारीला ५६, ५ जानेवारी ८०, ६ जानेवारी १०६, १४ जानेवारी ८८ तर १५ जानेवारीला १११ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली होती. १५ जानेवारीनंतर चार दिवसांनी बुधवारी पुन्हा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या शंभरहून अधिक असल्याचे दिसते.
मृत्युसंख्येत वाढ कायम
मुंबईत बुधवारी कोरोनामुळे एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दहा रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यातील ११ रुग्ण पुरुष, तर एक महिला रुग्ण असून, नऊ रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते. उर्वरित तीन रुग्णांचे वय हे ४० ते ६० या वयोगटामधील आहे.
मुंबईमध्ये मृत्युदर दोन टक्के असून आतापर्यंत १६,४७६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ३९ या वयोगटामध्ये झाल्याचे दिसत असून २,०१,३५९ जणांना संसर्ग झाल्याचे दिसून येते. तर ५० ते ५९ या वयोगटामध्ये १,६१,९४०, ६० ते ६९ या गटात १,१७,११३; तर ७० ते ७९ या वयोगटात ६६,१३८ जणांना संसर्ग झाल्याचे दिसते.
मुंबईत सर्वाधिक मृत्यू हे ६० ते ६९ या वयोगटात झाले असून, ही संख्या ४,५०६ इतकी आहे. ५० ते ५९ या वयोगटातील ३,४४५ जणांना प्राण गमवावे लागल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते.