पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पण उत्पल पर्रिकरांना भाजपने अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असलेल्या उत्पल यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. पण तिथून विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पणजी ऐवजी अन्य दोन जागांपैकी एका जागेचा पर्याय उत्पल पर्रिकर स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ”आम्ही उत्पल पर्रीकर यांना पर्याय दिला होता, पण त्यांनी पहिला पर्याय नाकारला. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी आता दिलेला पर्याय मान्य करायला हवा’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
त्याआधी फडणवीस यांनी काँग्रेससह तृणमूल आणि आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला. गोव्यात भाजप सरकारने विकास केला. पण काँग्रेस सरकारच्या काळात गोव्यात भ्रष्टाचार झाला. रेटून खोटं बोलणं हे ‘आप’चा धंदा आहे. तर तृणमूल काँग्रेसला आधीच गोव्यातील जनतेने नाकारले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले.