नवी दिल्ली : उत्तर भारतात अनेक भागात दाट धुके आणि थंडीचा परिणाम दिसून येत आहे. एकीकडे वाढत्या थंडीमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असतानाच खराब हवामानाचा परिणाम रेल्वे सेवेवरही होत आहे. देशातील अनेक भागात धुके इतके आहे की दररोज अनेक गाड्या कमी दृश्यमानतेमुळे कित्येक तास उशिराने धावत आहेत.
दिल्लीतील काही भागात हलका पाऊस पडला. दुसरीकडे, दाट धुक्यामुळे १३ ट्रेन उशिराने धावत असून २२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. हावडा-नवी दिल्ली एक्सप्रेस, पुरी-नवी दिल्ली एक्सप्रेस, गोरखपूर-नवी दिल्ली एक्सप्रेस, मुंबई-नवी दिल्ली एक्सप्रेस, कानपूर-नवी दिल्ली एक्सप्रेस यासह सुमारे १३ ट्रेन दाट धुक्यामुळे उशिराने धावत आहेत.
उशिराने धावणाऱ्या या गाड्यांच्या नावांमध्ये भालपूर-आनंद विहार एक्सप्रेस, आंबेडकरनगर-निजामुद्दीन एक्सप्रेस, मुंबई-नवी दिल्ली दादर एक्सप्रेस, विशाखापट्टणम-निजामुद्दीन एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
राजधानी दिल्लीत गेल्या ७ दिवसांपासून सततच्या थंडीच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. सलग सातव्या दिवशी दिल्लीला थंडीच्या लाटेपासून पूर्ण दिलासा मिळू शकला नाही. दरम्यान, दिल्लीत आज पाऊस पडू शकतो, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे सूर्यदर्शन होणार नाही आणि थंडीचा प्रभाव वाढेल
पावसासोबतच थंड वारेही वाहतील. पंजाब, हरयाणा, दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेशात २३ तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे या राज्यांचे किमान तापमानही २ ते ४ अंशांनी वाढू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.