Tuesday, April 29, 2025
Homeमहत्वाची बातमीभाजपसाठी उप‘योगी’

भाजपसाठी उप‘योगी’

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

तेवीस कोटी लोकसंख्या असलेल्या आणि पंधरा कोटींपेक्षा जास्त मतदार असलेल्या देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्वस्व पणाला लावले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, कट्टर हिंदुत्वाचा चेहरा, भगव्या वस्त्रातील दिग्गज व शक्तिशाली नेता अशी प्रतिमा असलेल्या योगी आदित्यनाथ यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरवले असून ते गोरखपूर मतदारसंघातून लढत आहेत. भाजपने उत्तर प्रदेशची यंदाची विधानसभा निवडणूक जिंकली, तर सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवणारा पक्ष ठरेलच; पण तब्बल अठरा वर्षांनंतर विधानसभा निवडणूक जिंकणारा मुख्यमंत्री म्हणून योगींची नोंद होईल. यापूर्वी म्हणजे १९८५मध्ये काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी हे विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन मुख्यमंत्री झाले होते.

योगी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात राज्यातील गुंडा आणि माफियाराज उद्ध्वस्त केले आणि चौफेर विकासावर लक्ष केंद्रीत केले. उत्तर प्रदेशमध्ये नोएडा हे मोठे वित्तीय केंद्र आहे. अखिलेश यादव यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नोएडाकडे दुर्लक्ष केले. पण योगींनी नोएडाच्या विकासाला गती दिली. सर्वात मोठी गुंतणूक नोएडामध्ये झाली. मोठे रुंद रस्ते, पूल, उड्डाण पूल, मेट्रो, नवीन विमानतळासाठी जागा अशा पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. कोविड काळात तर योगी हे नोएडा व राज्यातील अन्य भागांत औषधोपचारांच्या सेवासुविधांची पाहणी करण्यासाठी स्वतः फिरत होते.

पाच वर्षांपूर्वी योगी हे गोरखपूरचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार होते. गोरखपूर मठाचे मठाधिपती होते. मोदी- शहांनी त्यांची २०१७मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड केली, तेव्हा राजकीय वर्तुळात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पाच वेळा खासदार झालेले पण कधीही आमदार न झालेल्या योगींची निवड भाजपने कशी केली, याचेच मोठे गूढ वाटले. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून भाजपला जे प्रचंड यश मिळाले, त्यातून योगींची भाजपला असणारी उपयोगीता सिद्ध झाली.

सन २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अपना दल व एसबीएसपी या पक्षांशी जागावाटपाचा समझोता केला आणि ४०३पैकी ३२५ जागा जिंकल्या. मुख्यमंत्री योगी यांनी पाच वर्षांत अयोध्येचे सर्वाधिक दौरे केले. ‘मंदिर वही बनाएंगे’, हे आम्हीच पूर्ण करू शकतो असा संदेश त्यांनी दिला. राम पताका फडकविण्याचा अधिकार केवळ आमचाच आहे, हे त्यांनी जनतेच्या मनात बिंबवले. अयोध्येत भव्य राम मंदिर आम्ही उभारू शकतो, काशी विश्वनाथ संकुलाचे लोकार्पण आम्हीच करू शकतो, मग मथुरा मागे कशी राहील, असा प्रश्न स्वतः योगींनीच एकदा विचारला होता. राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले, काशी विश्वनाथ संकुलाचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. पंतप्रधान मोदी हे याच राज्यातील वाराणसीचे संसदेत प्रतिनिधित्व करीत आहेत. धर्म आणि कर्म हा भाजपचा अजेंडा आहे. श्रद्धा आणि विकास हा भाजपचा मंत्र आहे आणि तो योगींनी उत्तर प्रदेशात प्रभावीपणे राबविण्याचे काम केले आहे.

उत्तर प्रदेशातील ४३ लाख गरीब लोकांना हक्काची घरे मिळाली आहेत. पंधरा कोटी लोकांना दरमहा पाच किलो अतिरिक्त रेशन मिळत आहे. साडेचार लाख जणांना सरकारी नोकरी, पंचवीस लाख जणांना रोजगार मिळाला आहे. १ कोटी ४१ लाख जणांना मोफत वीज आणि १ कोटी ६१ लाख जणांना मोफत घरगुती गॅस सिलिंडर मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दीड लाख कोटीचे कर्ज योगी सरकारने माफ केले आहे.

योगींनी केलेली विकासकामे ही भाजपची मोठी जमेची बाजू आहे. पण शेतकरी आंदोलन, लखीमपूर ते गोरखपूर झालेल्या हिंसक घटना, वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी, कोविड काळात स्थलांतरीत मजुरांचे झालेले हाल, अशा अनेक मुद्यांवर सपाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीकेचा भडीमार चालू ठेवला आहे. मुख्यमंत्री हे विशिष्ट जातीचे असल्याने अन्य जाती- समाजावर योगी सरकारमध्ये अन्याय होत आहे, असा प्रचार तर पद्धतशीर चालू आहे. योगी यांची लोकप्रियता व दरारा यांचा आलेख गेल्या पाच वर्षांत उंचावल्यामुळेच सपा, बसप व काँग्रेसला त्यांच्या भवितव्याविषयी चिंता वाटू लागली. राज्याचे भगव्या वस्त्रातील हिंदू नेतृत्व म्हणून योगींवर जळणारे चोहोबाजूला आहेत. पण संन्यासाची भगवी वस्त्रे ही काही ते मुख्यमंत्री झाल्यावर अंगावर घातली नाहीत. कित्येक वर्षे ते संन्यासी व कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात योगींवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

उत्तर प्रदेशमधील योगींच्या दरबारात महत्त्व मिळाले नाही, आपल्यामागे चौकशा लागण्याची शक्यता आहे किंवा यावेळी पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही, हे लक्षात आल्यामुळेच सरकारमधील डझनभर आमदार व तीन चार मंत्र्यांनी निवडणुकींच्या तारखांचे रणशिंग फुंकल्यावर भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि डोक्यावर सपाची लाल टोपी चढवली. स्वामी प्रसाद मौर्य, दारासिंग चौहान, धर्मसिंह सैनी आदी नेत्यांनी पाच वर्षे सत्तासुख घेऊन बंडखोरी केली, पण पाच वर्षांत योगींच्या विरोधात ब्र काढण्याचीही त्यांची हिम्मत झाली नव्हती. पक्ष सोडताना सरकार हे शेतकरी व दलित विरोधी आहे, असे आरोप करण्याची गेल्या काही वर्षांपासून पद्धतच पडली आहे. पण अशा बंडखोरांना जनता कायमचा धडा शिकवते, अशीही उदाहरणे भरपूर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अशा सर्वांचा योगींना पाठिंबा आहे. राज्यात योगी व केंद्रात मोदी अशा डबल इंजिनचा उत्तर प्रदेशमधील विकासाला मोठा लाभ झाला आहे. केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यात योगी सरकारने लक्षणीय काम केले आहे. मोफत घरे किंवा स्वच्छता गृहांपासून ते कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेपर्यंत योगी सरकारने गतीमान काम केले आहे. म्हणूनच योगी हे उत्तर प्रदेशला व भाजपला उपयोगी आहेत. भाजपचा युपीमधील लोकप्रिय व विश्वासार्ह चेहरा अशी योगींची प्रतिमा आहे.

२०१४ची लोकसभा, २०१७ची विधानसभा आणि २०१९ची लोकसभा अशा पाठोपाठ तीन निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर प्रदेशवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. आता २०२२ची विधानसभा निवडणूक हे भाजपपुढे आव्हान आहे, ही निवडणूक २०२४च्या लोकसभा निवडणुकीची झलक असू शकते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -